( शिर्डी )
अभिनेता गोविंदा यांची पत्नी सुनीता आहुजा यांनी सोमवारी आपल्या आईसह शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना त्यांनी साईबाबांवरील अढळ श्रद्धा व्यक्त करत आपण नवीन वर्ष 2026 बाबत कुटुंबासाठी सुख, आरोग्य आणि आनंदाची प्रार्थना केल्याचे सांगितले.
“साईबाबांपेक्षा माझ्यासाठी या जगात काहीही मोठे नाही. दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात मी शिर्डीला येते. साईबाबांच्या दर्शनानंतर मनाला खूप आनंद आणि समाधान मिळते,” असे सुनीता आहुजा यांनी सांगितले. त्यांनी 2025 हे वर्ष स्वतःसाठी अत्यंत कठीण गेल्याचे मान्य करत, साईबाबांच्या आशीर्वादाने 2026 हे वर्ष नक्कीच चांगले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी त्यांनी गोविंदासाठीही विशेष प्रार्थना केल्याचे सांगितले. “नवीन वर्ष गोविंदासाठी चांगले जावे, त्याला साईबाबांनी सद्बुद्धी द्यावी, तो योग्य निर्णय घ्यावा आणि त्याची हिरोची प्रतिमा पुन्हा प्राप्त व्हावी,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आपल्या मुलांबाबत बोलताना सुनीता आहुजा म्हणाल्या की, आमच्या दोन्ही मुलांनी चित्रपटसृष्टीत स्वतःच्या मेहनतीवर नाव कमवावे, हीच माझी इच्छा आहे. “गोविंदा आणि मी त्यांना कोणतीही मदत करत नाही. त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे. मीही माझ्या आयुष्यात स्वतःच्या मेहनतीवर नाव कमावले आहे. आजही अनेकजण मला गोविंदाची बायको म्हणून ओळखत असतील, पण सोशल मीडियावर मी माझ्या नावाने ओळखली जाते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य करताना सुनीता आहुजा म्हणाल्या, “आजही मी साईबाबांकडे गोविंदाला सद्बुद्धी देण्याची प्रार्थना करते. या वयात अशा चर्चा शोभत नाहीत. जो कोणी आमचे घर तोडण्याचा प्रयत्न करत आहे किंवा गोविंदाला चुकीच्या गोष्टींसाठी मदत करत आहे, त्याला साईबाबा कधीही माफ करणार नाहीत,” अशी स्पष्ट प्रतिक्रिया त्यांनी दिली.
गोविंदाच्या कथित अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना सुनीता म्हणाल्या, “कोणीतरी मला गोविंदाचे एका अभिनेत्रीबरोबर नाव जोडले असल्याचे सांगितले होते. मात्र आमचा चाळीस वर्षांचा संसार कोणतीही बाहेरची व्यक्ती तोडू शकत नाही. साईबाबा आमच्या पाठीशी आहेत. गोविंदाने सगळ्या फालतू गोष्टी थांबवून आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावे,” असेही त्या म्हणाल्या.
गोविंदाच्या ‘अवतार’ चित्रपटाबाबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टरविषयी बोलताना सुनीता आहुजा म्हणाल्या की, त्यांना याबाबत कोणतीही माहिती नाही. “नवीन वर्षात गोविंदाने स्वतःमध्ये सुधारणा करावी आणि घरी परत यावे. कुटुंबापेक्षा मोठे काहीही नाही,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी नवीन चित्रपट निर्मात्यांनाही सल्ला देत, “संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहू शकेल, असे दर्जेदार आणि संस्कारक्षम चित्रपट तयार करावेत,” असे मत व्यक्त केले.

