(रायगड)
मुंबई–पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटात वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांमुळे अखेर अवजड वाहनांच्या प्रवेशावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश काढले असून, जीवितहानी टाळण्यासाठी हा निर्णय तातडीने अमलात आणण्यात आला आहे.
बोरघाटात अपघातांचं सत्र
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलनाका टाळण्यासाठी अनेक अवजड वाहनचालक शेडुंग फाट्याहून जुन्या महामार्गावर वळतात आणि बोरघाट ओलांडून पुन्हा एक्सप्रेस वेवर प्रवेश करतात. मात्र बोरघाट हा तीव्र उतार आणि वळणांचा परिसर असल्याने, या भागात अनेक गंभीर अपघात घडले आहेत. यामध्ये पर्यटक, लहान मुले, आणि निष्पाप प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच वाहनांच्या खोळंब्यामुळे घाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती.
मागील काही काळात बोर घाटात अवजड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. अनेकदा उतारामुळे ब्रेक निकामी होणे किंवा चालकांचे नियंत्रण सुटणे अशा कारणांमुळे मोठे अपघात (Accidents) घडले आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. अलीकडेच झालेल्या एका भीषण अपघातात एका कंटेनर ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली होती, ज्यात जीवितहानी झाली आणि वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरम्यान, या कालावधीत बोरघाटातील अवजड वाहतूक मुंबई पुणे दृतगती मार्गावरून वळवली जाणार आहे.
प्रवेशबंदीची अंमलबजावणी सुरु
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, खोपोली पोलीस स्टेशन आणि परिवहन विभागाला तत्काळ कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. घाटातील नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या बंदीमुळे बोरघाटातील वाहतूक सुलभ होईल, अपघातांचे प्रमाण लक्षणीय घटेल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुकर होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे. स्थानिक प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे अनेक नागरिक, पर्यटक आणि प्रवाश्यांनी स्वागत केले आहे.

