(चिपळूण)
शहरातील मार्कंडी परिसरातील कराड रोडवर नगर परिषदेने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक उभारलेले गतिरोधक (स्पीड ब्रेकर) नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. युनायटेड स्कूलजवळ दोन आणि सुवर्ण भास्कर पेट्रोल पंपाजवळ दोन असे एकूण चार स्पीड ब्रेकर बसवण्यात आले असून, यामुळे अवघ्या दोन दिवसांत ४ ते ५ दुचाकी अपघात घडले आहेत.
या अपघातांमध्ये मार्कंडी येथील रहिवासी अनिल फटकरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले असून, उपचारासाठी हाताच्या हाडात प्लेट बसवावी लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.
धोकादायक बाब म्हणजे या स्पीड ब्रेकर असल्याची कोणतीही सूचना फलक, रिफ्लेक्टर किंवा पांढरे पट्टे (रोड मार्किंग) करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी आणि वेगात जाणाऱ्या वाहनचालकांसाठी हे गतिरोधक मोठा धोका निर्माण करत आहेत.
हे स्पीड ब्रेकर नेमके कोणाच्या शिफारसीवर आणि कोणत्या निकषांनुसार टाकण्यात आले, असा सवाल संतप्त दुचाकीस्वार आणि स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. आधीच कराड रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना, नियोजनशून्य पद्धतीने गतीरोधक उभारून नगर परिषद नेमके काय साध्य करू पाहत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, नगर परिषदेने तातडीने या स्पीड ब्रेकरजवळ योग्य सूचना फलक, पांढरे पट्टे आणि रिफ्लेक्टर बसवावेत, तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

