(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
जीव वाचवण्यासाठी धावणारी 108 रुग्णवाहिका आज स्वतःच मृत्यूचा धोका बनली आहे. जिल्ह्यातील अनेक 108 रुग्णवाहिकांचे टायर पूर्णतः झिजून गुळगुळीत झाले असतानाही त्यांची अद्याप बदलापालट करण्यात आलेली नाही. अत्यंत धोकादायक अवस्थेत या रुग्णवाहिका रस्त्यावरून धावत असून, अपघात झाल्यास जबाबदारी नेमकी कोणाची? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी वापरली जाणारी ही सेवा आज रुग्णांचा जीव मुठीत धरून रस्त्यावर धावत आहे. टायर झिजलेल्या स्थितीत, ब्रेकिंग सिस्टीमवर ताण, घसरून अपघात होण्याची शक्यता असे सर्व धोके माहिती असूनही जिल्हा व्यवस्थापनाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, वाहनांच्या नियमित मेंटेनन्ससाठी शासनाकडून निधी उपलब्ध असतानाही टायर वेळेवर का बदलले जात नाहीत? देखभालीची जबाबदारी असलेल्या जिल्हा व्यवस्थापकांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे की काय? हाच प्रश्न सध्या थेट उपस्थित होत आहे.
एका बाजूला रुग्णवाहिकेतील चालक व पॅरामेडिकल कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला व्यवस्थापनाची उदासीनता ही सेवेवरच प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरत आहे. अपघात झाल्यानंतर चौकशी, अहवाल आणि समित्या हे सर्व नेहमीचेच करण्यापेक्षा अपघात होण्याआधीच जागे होणार कोण? हा महत्वाचा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. या गंभीर प्रकाराकडे पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालणे अत्यावश्यक आहे. कागदोपत्री अहवालांपेक्षा प्रत्यक्ष रस्त्यावर धावणाऱ्या रुग्णवाहिकांची स्थिती तपासून, दोषींवर कारवाई करणे आणि तात्काळ टायर बदलण्याचे आदेश देणे ही काळाची गरज आहे.
रुग्णवाहिकेतील अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणेही बंद
108 रुग्णवाहिकांमधील अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे सध्या बंद, नादुरुस्त किंवा निष्क्रिय अवस्थेत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. वाहनात लागणारी साधने केवळ नावापुरती उपलब्ध असून आपत्कालीन वेळी ती प्रत्यक्षात चालूच होत नाहीत, ही बाब अत्यंत गंभीर आहे. रुग्णवाहिकेतील उपकरणे कार्यरत नसतील, तर ती रुग्णवाहिका वाहन नसून मृत्यू वाहून नेणारा डबा ठरतो, याची जाणीव व्यवस्थापनाला आहे का?

