(नाशिक)
मुंबईनंतर नाशिकमध्येही ठाकरे बंधू एकत्र आले असून, अनंत हुतात्मा कान्हेरी मैदानावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा पार पडली. या सभेत दोघांनीही भाजपवर तीव्र शब्दांत टीका करत, ही निवडणूक सत्तेसाठी नसून भविष्यासाठी असल्याचे मतदारांना सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर थेट हल्ला चढवताना म्हटले की, “तपोवनातील झाडे छाटण्याआधी भाजपने स्वतःच्या पक्षातील जुनी माणसे छाटली. नाशिकमध्ये भाजपात काम करणारी जुनी माणसे होती, पण आता त्यांना दुसऱ्या पक्षातील पोरं भाड्यानं घ्यावी लागत आहेत.” पैसे देऊन कार्यकर्ते आयात करणारा भाजप उपऱ्यांचा पक्ष झाला असल्याची टीकाही त्यांनी केली.
राज ठाकरे यांनी तपोवनातील वृक्षतोडीवर जोरदार आक्षेप घेतला. “आमच्या काळात कुंभमेळा झाला, तेव्हा एकही झाड कापले गेले नाही. मग आता उद्योगपती आणि बिल्डरांसाठी तपोवनातील झाडे का कापली जात आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. फडणवीसांनी नाशिक शहर दत्तक घेतले होते, पण दत्तक घेणारा बाप परत फिरकलाच नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, “भाजपचे हिंदुत्व खरे आहे की फक्त निवडणुकीपुरते आहे? राम मंदिर केल्याचा डंका पिटला, पण जिथे प्रभू रामचंद्रांनी तपश्चर्या केली, तिथली झाडे कापली जात आहेत.” भाजप हा आज उपटसुंभांचा आणि दलालांचा पक्ष झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मतदारांना स्पष्ट संदेश दिला. “आम्ही दोघे जे बोलतो ते करून दाखवतो. तुमच्या भावी पिढीसाठी आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही चमत्कार घडवू,” असे आवाहन त्यांनी केले. मुंबईप्रमाणे नाशिकमध्ये महानगरपालिका शाळा सुधारण्याचे, बस सेवा सुरू करण्याचे आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.
निवडणूक प्रक्रियेवरही दोघांनी टीका केली. बिनविरोध निवडून येणारे नगरसेवक, उमेदवारांना कोट्यवधी रुपये दिले जात असल्याचे आरोप आणि निवडणूक आयोगाची भूमिका यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
दरम्यान, शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, “नाशिकच्या तपोवनात सुमारे दोन हजार झाडे तोडली गेली असून, हे कंत्राट ज्याला देण्यात आले आहे तोच ठेकेदार भाजपच्या निवडणुकीचा खर्च उचलणार आहे.” कुंभमेळ्याच्या नावाखाली नाशिकमध्ये 50 हजार कोटींची कामे होणार असून, ती कंत्राटे गुजरातच्या ठेकेदारांना देण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.
ठाकरे बंधूंच्या या पहिल्याच संयुक्त सभेमुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आगामी महापालिका निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

