( मुंबई )
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना अधिकृत थांबा देण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांचा, विशेषतः गणेशोत्सवाच्या काळातील प्रवास अधिक सोयीस्कर होणार असून कोकण रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीलाही मोठे बळ मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 मार्च 2026 रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने 7 जुलै 2026 रोजी मंजुरीचे अधिकृत पत्र जारी केले. त्यानुसार आता सावंतवाडी रोड स्थानकावर तीन महत्त्वाच्या रेल्वेगाड्या नियमित थांबणार आहेत.
या 3 एक्सप्रेस गाड्यांना मिळाला सावंतवाडी रोड येथे थांबा
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मंगळुरू एक्सप्रेस
- तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – तिरुवनंतपुरम नॉर्थ (कोचुवेली) गरीब रथ एक्सप्रेस
या निर्णयामुळे मुंबई, दिल्ली, केरळ आणि कर्नाटकमार्गे प्रवास करणाऱ्या कोकणातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. रेल्वे आरक्षणासाठी प्रचंड स्पर्धा पाहायला मिळते. अशा परिस्थितीत सावंतवाडी रोड येथे या महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळाल्याने सिंधुदुर्ग आणि दक्षिण कोकणातील प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले आभार
या मंजुरीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “माझ्या विनंतीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर आणखी तीन महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार.” तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी सातत्याने सहकार्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले.
पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणार चालना
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या निर्णयामुळे कोकणची रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल. प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होण्यासोबतच पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल. विशेषतः गणेशोत्सव, पर्यटन हंगाम आणि सुट्टीच्या काळात या निर्णयाचा मोठा फायदा कोकणवासीयांना होणार आहे.

