(मुंबई)
कांदिवली येथील मिलिटरी मार्गावरील ईएसआयसी रुग्णालयाच्या मागे असलेल्या राम किसन मेस्त्री चाळीत आज (बुधवारी) सकाळी ९ वाजताच्या सुमारास सिलिंडरमधून झालेल्या वायुगळतीमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
दुकानातील एलपीजी सिलिंडरमधून गळती सुरू असताना अचानक मोठा स्फोट होऊन आग भडकली. काही क्षणांतच ज्वाळांनी दुकान व परिसराला वेढा घातला. विजेच्या तारा आणि विद्युत यंत्रणेमुळे आगीचा प्रसार अधिक वेगाने झाला. माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे आणि बचावकार्य हाती घेतले.
या दुर्घटनेत शिवानी गांधी (५१), नीतू गुप्ता (३१), जानकी गुप्ता (३९), मनराम कुमावत (५५), रेखा जोशी (४७), दुर्गा गुप्ता (३०) आणि पुनम (२८) हे जखमी झाले. त्यापैकी शिवानी, नीतू, जानकी आणि मनराम यांना तत्काळ ईएसआयसी रुग्णालयात, तर इतरांना बीडीबीए रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी सहा जण ७० ते ९० टक्के भाजले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

