(मुंबई)
राज्यातील सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या कमतरतेवर अखेर तोडगा निघणार आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांच्या शाळांमध्ये एकूण सुमारे 9 हजार शिक्षक पदांची भरती करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया मार्च महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. मार्चपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार असून, उमेदवारांना घरबसल्या अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षातील रिक्त पदांबरोबरच मे 2026 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या जागांचाही समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची तीव्र कमतरता जाणवत आहे. काही शाळांमध्ये विशिष्ट विषय शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात आमदारांनी शिक्षक भरतीची जोरदार मागणी केली होती. अखेर या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या भरती प्रक्रियेत जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांच्या शाळांमधील रिक्त पदे भरली जाणार आहेत. सध्या या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुमारे 5,700 पदे रिक्त आहेत. त्यासोबतच, पुढील काही महिन्यांत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या जागांचाही समावेश करण्यात येणार आहे.
25 मार्च 2024 रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार, 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा परिषद शाळांची संचमान्यता प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेत अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे पहिल्यांदाच समायोजन केले जाणार आहे. यानुसार, रिक्त पदांच्या 80 टक्के जागा भरल्या जाणार असून उर्वरित जागांबाबत पुढील टप्प्यात निर्णय घेतला जाणार आहे.
राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांना मे 2026 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे भरती प्रक्रियेत समाविष्ट करून त्याबाबतची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता राहील, असा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे.

