(पुणे )
भारतीय पर्यावरण चळवळीचे आधारस्तंभ आणि पश्चिम घाटांच्या जैवविविधतेचे कट्टर रक्षक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे बुधवारी रात्री पुण्यात प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी चार वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाने देशच नव्हे तर जागतिक पातळीवरील एक अभ्यासू, लोकाभिमुख आणि संवेदनशील वैज्ञानिक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनामुळे पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र सिद्धार्थ गाडगीळ यांनी एका निवेदनाद्वारे दिली.
भारतातील पर्यावरणविषयक जाणीवा जागृत ठेवण्यात आणि विशेषत: पश्चिम घाटांमधील जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात डॉ. गाडगीळ यांचे योगदान अतुलनीय आहे. पश्चिम घाटांमध्ये सुरू असलेल्या अनियंत्रित विकासकामांमुळे पर्यावरणीय समतोल बिघडू शकतो, असा इशारा त्यांनी सर्वप्रथम प्रशासनाला दिला होता. पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी त्यांनी तयार केलेला ‘गाडगीळ अहवाल’ हा विकासाच्या नावाखाली होणाऱ्या पर्यावरणीय हानीवर ठळक बोट ठेवणारा दस्तऐवज ठरला.
डॉ. माधव धनंजय गाडगीळ हे भारतातील अग्रगण्य परिसंस्था शास्त्रज्ञ आणि संवर्धन तज्ज्ञ होते. बंगळुरु येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये त्यांनी सेंटर फॉर इकोलॉजिकल सायन्सेसची स्थापना केली. जैवविविधता, लोकसंख्याशास्त्र आणि पर्यावरणीय अर्थशास्त्र या विषयांवर त्यांनी मूलभूत संशोधन केले. हार्वर्ड विद्यापीठातून पीएच.डी. पूर्ण करून त्यांनी भारतात परिसंस्थेच्या वैज्ञानिक अभ्यासाला नवी दिशा दिली.
२०११ मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखालील वेस्टर्न घाट्स इकोलॉजी एक्सपर्ट पॅनेलने सादर केलेला अहवाल हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या अहवालात पश्चिम घाटांना पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याची शिफारस करण्यात आली होती. खाणकाम, धरणे आणि अनियंत्रित विकासावर निर्बंध घालून विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल साधण्यावर त्यांनी भर दिला. राजकीय आणि व्यावसायिक दबावामुळे हा अहवाल पूर्णपणे अंमलात आला नसला तरी तो आजही पर्यावरणीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
डॉ. गाडगीळ यांनी नेहमी समुदायाधारित संवर्धनावर भर दिला. ग्रामसभांना अधिकार देऊन स्थानिक नागरिकांना पर्यावरण रक्षणात सहभागी करणे, ही त्यांची ठाम भूमिका होती. ‘पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर’ ही संकल्पना त्यांनी मांडली, ज्यामुळे गावपातळीवर जैवविविधतेची नोंद आणि संरक्षण शक्य झाले.
त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना पद्मश्री (1981), पद्मभूषण (2006) तसेच संयुक्त राष्ट्रांचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ हा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार मिळाला होता. पश्चिम घाटातील जैवविविधतेवरील त्यांचे संशोधन जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आहे.
आज वाढत्या नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणीय संकटांच्या पार्श्वभूमीवर डॉ. माधव गाडगीळ यांनी दिलेले इशारे किती दूरदृष्टीचे होते, याची प्रकर्षाने जाणीव होत आहे. त्यांच्या निधनाने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातील एका सुवर्णकाळाचा अंत झाला असून, पर्यावरणप्रेमी, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

