(बुलावायो)
आयसीसी 19 वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषकाचा 16 वा हंगाम आज 15 जानेवारीपासून झिम्बाब्वे आणि नामिबिया या दोन आफ्रिकन देशांमध्ये सुरू होत आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेचा अंतिम सामना 6 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. युवा क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या स्पर्धेतून अनेक खेळाडू पुढे जागतिक क्रिकेटचे स्टार बनले आहेत.
मागील 2024 च्या आवृत्तीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासात भारत हा सर्वाधिक यशस्वी संघ ठरला असून भारताने आतापर्यंत पाच वेळा विजेतेपद जिंकले आहे. ऑस्ट्रेलियाने चार वेळा, पाकिस्तानने दोन वेळा, तर वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी एकदा विजेतेपद मिळवले आहे.
यंदाच्या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होत असून त्यांना चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्स फेरीत प्रवेश करतील, तर चौथ्या क्रमांकाचे संघ प्लेसमेंट सामने खेळतील. ग्रुप अ आणि ग्रुप ड मधील टॉप तीन संघ एक सुपर सिक्स गट तयार करतील, तर ग्रुप ब आणि ग्रुप क मधील अव्वल तीन संघ दुसऱ्या सुपर सिक्स गटात असतील. येथून सेमीफायनल आणि त्यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल.
या अंडर-19 विश्वचषकात आयुष म्हात्रे आणि दीपेश देवेंद्रन यांच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा खेळाडू म्हणजे अवघा 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी. विश्वचषकापूर्वीच्या सराव सामन्यांमध्ये तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या युवा वनडे मालिकेत वैभवने दमदार फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याची कामगिरी कायम राहिल्यास भारताच्या विजेतेपदाच्या आशा अधिक बळकट होतील. अल्पवयातच अनेक विक्रम प्रस्थापित करणारा वैभव या स्पर्धेत आणखी इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.
अंडर-19 विश्वचषकातील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरू होतील. सामन्याच्या अर्धा तास आधी टॉस होणार असून त्या वेळी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली जाईल.
लाईव्ह सामना कुठे पाहाल?
अंडर-19 विश्वचषकातील टीम इंडियाचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केले जातील. तसेच जिओ हॉटस्टार अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. मोबाईलवर सामना पाहण्यासाठी चाहत्यांना जिओ हॉटस्टार अॅपची आवश्यकता असेल.
अंडर-19 विश्वचषक 2026 साठी टीम इंडिया संघ:
आयुष म्हात्रे (कर्णधार), आर. एस. अंबरीश, कनिष्क चौहान, दीपेश देवेंद्रन, मोहम्मद अनन, आरोन जॉर्ज, अभिज्ञान कुंडू, किशन कुमार सिंग, विहान मल्होत्रा, उद्धव मोहन, हेनिल पटेल, खिलन ए. पटेल, हरवंश सिंग, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी.

