(मुंबई)
मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीत इतिहास रचत आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 25 दिवसांत 100 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये प्रवेश केला असून असा विक्रम करणारा तो पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.
कोइमोईच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 57.7 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात 27 कोटी, तर तिसऱ्या आठवड्यात 13.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यानंतरही चित्रपटाची कमाई कायम राहिली. 22 व्या दिवशी 70 लाख, 23 व्या दिवशी 1.35 कोटी आणि 24 व्या दिवशी 1.4 कोटी रुपयांची कमाई झाली.
‘राजा शिवाजी’ची एकूण कमाई किती?
चित्रपटाचे भारतातील निव्वळ कलेक्शन 101.4 कोटी रुपये झाले आहे. तर ग्रॉस कलेक्शन 119.65 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जगभरातील एकूण कमाईचा आकडा तब्बल 124.55 कोटी रुपयांवर गेला आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट सुमारे 75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. त्यामुळे चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर मोठ्या नफ्यात असल्याचे मानले जात आहे.
रितेश देशमुखची भावुक पोस्ट चर्चेत
चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली. त्यांनी फक्त तीन शब्द वापरत चाहत्यांचे आभार मानले. “आभार – कृतज्ञ – ऋणी” रितेशची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
- राजा शिवाजी – 101.4 कोटी
- सैराट – 90 कोटी
- बाईपण भारी देवा – 76.28 कोटी
- वेद – 61.2 कोटी
- नटसम्राट – 42 कोटी
- पावनखिंड – 37.72 कोटी
- लय भारी – 37 कोटी
- कट्यार काळजात घुसली – 35 कोटी
- ठाकरे – 31.6 कोटी
- टाईमपास – 30 कोटी
‘सैराट’चा रेकॉर्ड मोडला
याआधी नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ हा 90 कोटी रुपयांची कमाई करणारा सर्वाधिक यशस्वी मराठी चित्रपट होता. मात्र आता ‘राजा शिवाजी’ने हा विक्रम मोडत 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा पहिला मराठी चित्रपट बनण्याचा मान मिळवला आहे.
कलाकारांची दमदार फौज
या चित्रपटात रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर जेनेलिया देशमुख, अभिषेक बच्चन आणि विद्या बालन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अभिनेता सलमान खान यांची छोटेखानी भूमिका देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. याशिवाय रितेश देशमुख यांचा 10 वर्षीय मुलगा राहिल देशमुख यानेही या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

