(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रेल्वे स्टेशन स्टॉपजवळ गटारातून बाहेर पडलेले दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावर साचून तळ्याचे स्वरूप घेत असल्याने परिसरातील नागरिक ये-जा करताना नाक- तोंड दाबून जाणे पसंद करत आहेत. महामार्गाच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या रवी इन्फ्रा बिल्ड कंपनीचा बेजबाबदार व नियोजनशून्य कारभार पुन्हा एकदा समोर आला असून, नागरिकांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.
याच कुवारबाव परिसरात सध्या जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू असून, नवीन गटार तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात आवश्यक ती खबरदारी न घेता काम सुरू ठेवल्यामुळे जुन्या गटारात पाणी वळविण्याची साधी तात्पुरती व्यवस्था देखील करण्यात आलेली नाही. परिणामी गेल्या तीन दिवसांपासून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर साचून राहिले असून, डासांचा प्रादुर्भाव, दुर्गंधी आणि आजारांचा धोका प्रचंड वाढला आहे.
गटाराचे पाणी योग्य पद्धतीने जुन्या वाहिनीत सोडले असते, तर ही परिस्थिती ओढवलीच नसती. मात्र ‘काम सुरू आहे’ या एकाच सबबीखाली ठेकेदार कंपनी जणू काही सर्वकाही मोकाट करण्याच्या मानसिकतेत वागत असल्याचे चित्र दिसत आहे. सार्वजनिक रस्त्यावर साचलेले घाण पाणी पाहता, ठेकेदाराला नागरिकांच्या सुरक्षिततेशी वा आरोग्याशी काहीही देणेघेणे नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
अधिक गंभीर बाब म्हणजे, या संपूर्ण प्रकाराकडे महामार्ग प्राधिकरण विभागानेही डोळेझाक केल्याचे स्पष्टपणे दिसते. कामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि पर्यावरणीय नियम यांची तपासणी करण्याची जबाबदारी असताना, संबंधित अधिकारी केवळ मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याचा रोष व्यक्त होत आहे. ठेकेदाराच्या गलथानपणावर वेळेत लगाम घातला गेला नाही, तर भविष्यात याहून गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती नाकारता येत नाही. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना, महामार्ग प्राधिकरणाने तातडीने अशा कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावे, तसेच साचलेले घाण पाणी त्वरित हटवून योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आता परिसरातून होत आहे.

