(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या उपाध्यक्षपदासह विविध विषय समिती सभापती पदांच्या निवडणूक प्रक्रियेत बुधवारी राजकीय घडामोडींना वेग आला आणि अखेर सर्व नियुक्त्या बिनविरोध झाल्याने सत्ताधारी पक्षाने अनुभव व नव्या नेतृत्वाचा समतोल साधणारी नवी फळी पुढे केली. शिवसेना मुख्यनेते तथा एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शिवसेना उपनेते व पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेल्या नावांवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. आगामी सव्वा वर्षाचा कार्यकाळ डोळ्यासमोर ठेवून नव्या कारभाऱ्यांकडे जिल्ह्यातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
येथील बाळासाहेब ठाकरे सभागृह येथे पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मानसिंग जाधव यांनी कामकाज पाहिले. विहित मुदतीत प्रत्येक पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने सर्व निवडी बिनविरोध घोषित करण्यात आल्या. उपाध्यक्षपदी निवड झालेल्या विलास चाळके यांच्याकडे बांधकाम आणि आरोग्य या महत्त्वपूर्ण विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली असून, विकासकामांच्या गतीसह मूलभूत सेवांच्या बळकटीकरणाची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
राजकीय निष्ठा आणि संघटनात्मक सातत्य यांचा विचार करून केलेल्या या निवडीत गोळप गटातून ऐतिहासिक विजय संपादन करणारे नंदकुमार मुरकर यांच्याकडे अर्थ व शिक्षण सभापती पदाची धुरा देण्यात आली आहे. आर्थिक नियोजन आणि शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार मानली जात आहे. तसेच हातखंबा गटात पक्षाचे अस्तित्व कायम राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ॲड सुयोग कांबळे यांची समाजकल्याण सभापती म्हणून निवड झाली असून सामाजिक न्यायाशी निगडित योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली आहे.
प्रादेशिक प्रतिनिधित्वाचा विचार करत चिपळूण तालुक्याला स्थान देताना सौ. मयुरी मिलिंद शिर्के यांची महिला व बालकल्याण सभापती म्हणून निवड करण्यात आली, तर गुहागर तालुक्यातील महेश नाटेकर यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन समितीची सूत्रे सोपविण्यात आली. ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकरी धोरणे आणि महिला सक्षमीकरण या विषयांना गती देण्याचा प्रयत्न या नियुक्त्यांमधून स्पष्ट होत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
निवडीनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या प्रसंगी माजी आमदार संजय कदम, सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, राहुल पंडित यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. नव्या दमाच्या या नेतृत्वपथकाकडून प्रशासनात गती, समन्वय आणि परिणामकारक निर्णयक्षमतेची अपेक्षा व्यक्त होत आहे.

