(देवळे / प्रकाश चाळके)
रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे आणि आज (७ जानेवारी रोजी) वाढदिवस असलेले आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांचा वाढदिवस साखरपा विभागात ६ जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी शुभेच्छा स्वीकारताना आमदार भैय्या सामंत यांनी आपल्या नेहमीच्या स्पष्ट शैलीत मनोगत व्यक्त केले. “मला भाषण करता येत नाही, भावना व्यक्त करता येत नाहीत. इच्छा नसतानाही मी आमदार झालो. पण लोकांची कामं मात्र मला चांगली करता येतात,” असे ते म्हणाले.
आमदार झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मी ठरवलं होतं की माझ्या मतदारसंघातील माता-भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवायचा. राजापूर मतदारसंघात हे काम पहिल्या सहा महिन्यांत पूर्ण केलं. तालुका टँकरमुक्त केला, याचे मला समाधान आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हलक्याफुलक्या शब्दांत एक टोला लगावला. “काही कार्यकर्ते मला झेरॉक्स मशीन समजतात. इकडे पेपर टाकला की तिकडे डबल प्रिंट यायला हवी, काम सांगितलं की ते लगेच सुरू व्हायला हवं. खरेतर कामे वेळेत होण्यासाठीच माझा कायम प्रयत्न असतो, यातून काही कामं वेळेआधीही पूर्ण होतात” असे ते म्हणाले.
यावर्षी राजापूर आणि लांजा तालुक्यांत दोन मोठे प्रकल्प येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. हे प्रकल्प लांजा तालुक्यातील ओसाड रानमाळात होणार असून, त्यामुळे अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र साखरपा विभागात जागेचा प्रश्न असल्याने मोठे प्रकल्प आणणे कठीण आहे. त्या ठिकाणी पाणीपुरवठ्यासाठी योजना राबवता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मतदारसंघातील प्रत्येक मुलाला कौशल्य विकासाच्या संधी मिळाव्यात म्हणून शाळांना सूचना दिल्या होत्या. मात्र अद्याप एकाही शाळेने याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“विकासाची कामं कधीच पूर्ण होत नाहीत आणि ती थांबतही नाहीत. एक काम पूर्ण झालं की दुसरं काम समोर येतं. ही प्रक्रिया सतत सुरू राहणार आहे. पुढील काळात शाळा आणि आरोग्य विषयक कामांना प्राधान्य दिलं जाईल,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र महाडिक, माजी आमदार सुभाष बने, माजी शिक्षण सभापती विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख राजेश पत्याणी, माजी सभापती जया माने, देवरूख पोलीस निरीक्षक झावरे, नायब तहसीलदार गिरी, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, विलास बेर्डे, विभागप्रमुख राजू कामेरकर, बापू शेटे, उद्योजक विष्णू शेठ रामाने यांच्यासह संजय गांधी, प्रसाद सावंत, सचिन मांगले, प्रसाद अपंडकर, रेश्मा परशेटे, ओंकार कोलते, अंकुश सुर्वे आदी कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

