(रत्नागिरी सिंधुदुर्ग /प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग-मालवण आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त पदांवर नियुक्त असलेले सागर कुवेसकर सध्या वैद्यकीय कारणास्तव रजेवर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत दोन्ही जिल्ह्यांचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात इतर अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या संदर्भात मत्स्यव्यवसाय आयुक्तालय, मुंबई यांनी दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी अधिकृत आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, सिंधुदुर्ग-मालवण येथील सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी प्रतिक महाडवाला यांच्याकडे देण्यात आला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय पदाचा अतिरिक्त कार्यभार रत्नागिरीतील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जि. द. सावंत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
नवीन कार्यभार स्विकारलेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या मूळ पदाच्या जबाबदाऱ्यांसह हा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश येईपर्यंत पार पाडावा, अशी स्पष्ट सूचना आदेशात देण्यात आली आहे. सागर कुवेसकर यांच्या रजेवरून परतल्यानंतर ही तात्पुरती कार्यभार योजना आपोआप समाप्त होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.