(दापोली)
क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने आयोजित शालेय पावरलिफ्टिंग स्पर्धेच्या रत्नागिरी विभागीय फेरीत वराडकर बेलोसे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे आर्या देवघरे, खुशाली गोविलकर आणि दैवत वाघे या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय शालेय पावरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रत्नागिरी येथे पार पडलेल्या या विभागीय स्पर्धेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतील शालेय स्तरावरील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत वराडकर बेलोसे कनिष्ठ महाविद्यालयाच्या तिन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या-आपल्या वजनगटात प्रथम क्रमांक पटकावत उत्कृष्ट कामगिरी केली.
या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक पुनम सावंत यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे सभापती धनंजय यादव, कार्यवाह डॉ. दशरथ भोसले आणि पर्यवेक्षक लक्ष्मीकांत पाटील उपस्थित होते. या यशामुळे दापोलीसह रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.

