(रत्नागिरी / प्रतिनिधी)
“ट्रक बाजूला घ्या” असे विनवले असताना रागाच्या भरात रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड फेकून गंभीर इजा केल्याची घटना सोमवारी दुपारी रत्नागिरी शहरातील चर्मालय परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी शोएब आझाद मुकादम (३५, रा. कोकणनगर, रत्नागिरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फजल अब्दुल लतीफ गुहागरकर (३९, रा. स्टेट बँक कॉलनी, रत्नागिरी) हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०८ एक्यू ४५९०) घेऊन पाटणकर रेसिडेन्सीकडे जात होते. यावेळी त्यांच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर संशयित शोएब मुकादम यांच्या दुकानाचे सामान घेऊन आलेला ट्रक उभा होता. रिक्षा आत घालण्यासाठी ट्रक बाजूला करण्याची विनंती केली असता शोएब याने रागाच्या भरात फजल गुहागरकर यांना शिवीगाळ करत थेट बाजूचा दगड उचलून त्यांच्या डोक्यात फेकला, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, तातडीने त्यांना रत्नागिरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास शहर पोलिस करत आहेत. या प्रकारामुळे शहरातील पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेच्या अडचणी पुन्हा एकदा समोर आल्या असून, स्थानिक प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.