(सिंधुदूर्ग / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवलीजवळील नांदगाव ओटव फाटा येथे आज (सोमवारी, १६ नोव्हेंबर) रोजी सकाळी झालेल्या कार अपघातात सिंधुदुर्गातील प्रख्यात कवयित्री आणि प्राध्यापिका डॉ. शरयू कृष्णा आसोलकर (वय ५९, रा. माठेवाडा, सावंतवाडी) यांचा मृत्यू झाला. अचानक कारसमोर आलेल्या गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार महामार्गाच्या दुभाजकावर आदळली. या अपघातात त्यांचे भाऊ वैभव कृष्णा आसोलकर (वय ४६) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शरयू आसोलकर आणि त्यांचे भाऊ वैभव हे रविवारी काही कामानिमित्त रत्नागिरी येथे आले होते. काम आटोपून दोघेही कारने सावंतवाडीच्या दिशेने परतत होते. आज सकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची कार कणकवली तालुक्यातील नांदगाव ओटव फाटा परिसरात पोहोचली. याचवेळी अचानक एक गाय कारसमोर आल्याने तिला वाचवण्यासाठी चालकाने कार बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटले आणि कार महामार्गाच्या दुभाजकावर जोरदार आदळली.
धडकेची तीव्रता मोठी असल्याने डॉ. शरयू आसोलकर आणि त्यांचे भाऊ वैभव दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. नांदगावच्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी या घटनेची माहिती कणकवली पोलीस ठाण्याला दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी चंद्रकांत झोरे यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
जखमींना नांदगाव केंद्राच्या तसेच नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कणकवली येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉ. शरयू आसोलकर यांचा मृत्यू झाला. त्यांचे भाऊ वैभव आसोलकर यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डॉ. शरयू आसोलकर या कुडाळ येथील महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. प्राध्यापिका म्हणून अध्यापन क्षेत्रात योगदान देतानाच त्यांनी कवयित्री म्हणूनही मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच सिंधुदुर्गातील शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. सावंतवाडी परिसरासह साहित्यप्रेमींमध्येही हळहळ व्यक्त होत असून, एका प्रतिभावान कवयित्रीच्या निधनाने साहित्यविश्वाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.


