(मुंबई)
राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे सरकारी डिजिटल यंत्रणेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शेंदुरसणी ग्रामपंचायतीतील जन्म व मृत्यू नोंदणीच्या डिजिटल नोंदींमध्ये मोठी तफावत आढळून आली असून, या प्रकरणी गृह विभागाने विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी स्थापन केली आहे.
अवघ्या सुमारे 1300 लोकसंख्या असलेल्या शेंदुरसणी गावात नागरी नोंदणी प्रणाली (सीआरएस) सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तब्बल 27 हजार जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे जारी झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. गावाची प्रत्यक्ष लोकसंख्या आणि जारी केलेल्या प्रमाणपत्रांमधील ही प्रचंड तफावत डिजिटल प्रणालीचा गैरवापर, डेटा मॅनिप्युलेशन आणि मोठ्या प्रमाणावरील फसवणुकीकडे स्पष्टपणे निर्देश करते.
या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 2023 मधील विविध कलमांखाली तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 65 आणि 66 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, गृह विभागाने महाराष्ट्र सायबरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली असून, या पथकात आरोग्य सेवा उपसंचालक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे.
तपासाच्या तांत्रिक बाबींवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र सायबर आणि आरोग्य विभागांमध्ये अलीकडेच समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत आयपी लॉगचे सखोल विश्लेषण करण्यात आले असून, ज्या व्यक्तींच्या नावाने बनावट जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे जारी झाली आहेत, त्यांची माहिती आणि पार्श्वभूमी तपासली जात आहे.
बनावट प्रमाणपत्र प्रकरणातील तपास पुढे नेण्यासाठी एसआयटी पथक या आठवड्यात गुरुवार किंवा शुक्रवारी शेंदुरसणी ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष भेट देण्याची शक्यता आहे. या दौऱ्यादरम्यान प्रत्यक्ष कागदपत्रांची तपासणी, डिजिटल नोंदी आणि जमिनीवरील वास्तव यांची पडताळणी केली जाणार आहे. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट रेकॉर्ड कसे तयार झाले, यामागील प्रणालीगत त्रुटी शोधण्यावरही भर दिला जाणार आहे.
सार्वजनिक नोंदणी व्यवस्थेत छेडछाड करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा गटाला पाठीशी घातले जाणार नाही. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर तसेच विभागीय कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा एसआयटीकडून देण्यात आला आहे.

