(हातकणंगले / वृत्तसंस्था)
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरातील आरती करून घरी परतणाऱ्या नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याने माणगाव हादरले आहे. स्वरा नितीन उपाध्ये (वय १४ वर्षे) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणात अरुण लगम्मावर (वय ३७, रा. माणगाव) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून, हातकणंगले पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेनंतर रविवारी माणगावमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. रविवारी दुपारी शवविच्छेदनानंतर स्वराचा मृतदेह गावात आणण्यात आला. यावेळी महिला, युवक आणि आबालवृद्धांना अश्रू अनावर झाले. संशयिताला अटक होईपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, अशी भूमिका संतप्त महिलांनी घेतली. त्यामुळे काही काळ गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर पोलीस प्रशासन आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांनी महिलांची समजूत काढली. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गांवरून स्वराची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते.
स्वरा ही माणगाव येथील चंद्रप्रभू मंदिराच्या आवारात राहत होती. ती धार्मिक वृत्तीची असल्याने नवरात्रोत्सवादरम्यान ती दररोज मंदिरातील आरतीला उपस्थित राहत असे. शनिवारीही ती नेहमीप्रमाणे वैष्णवी देवीच्या मंदिरात आरतीसाठी गेली होती. आरती संपल्यानंतर घरी परतत असताना मंदिराच्या बाहेरच तिच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. संशयिताने एडक्यासारख्या धारदार शस्त्राने तिच्यावर वार केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली स्वरा रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. या घटनेमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संशयित अरुण लगम्मावर याच्या संशयास्पद हालचाली टिपल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित फुटेज पोलिसांनी पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहे. संशयिताचा स्वभाव हिंसक असून, तो मनोरुग्ण असल्याची चर्चा गावात सुरू आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. संशयिताच्या घरावर गावातील महिलांनी मोर्चा काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा अडवला.
या हत्येप्रकरणी संशयिताला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा आणि खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, या मागण्यांसाठी आज (सोमवार)पासून माणगाव येथील गांधी चौकात युवक आमरण उपोषण करणार असल्याचे माणगावचे माजी सरपंच राजू मगदूम यांनी जाहीर केले.
स्वरा उपाध्ये हिच्या हत्येचा निषेध करण्यासाठी रविवारी रात्री माणगावमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला. या निषेध मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. स्वराच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली असून, या घटनेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, हल्ल्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे हातकणंगले पोलिसांकडून तपास सुरू आहे. संशयित अरुण लगम्मावर याला शोधण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.


