(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील रामआळी परिसरात रविवारी सकाळी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. जनता सहकारी बँकेच्या एटीएमजवळील मोकळ्या जागेत झोपलेल्या एका मजुरावर स्टीलच्या पाईपने डोक्यात घाव घालून गंभीर जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वायंगणी येथील स्वप्निल सुनील पाटील याच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश यशवंत भारती (वय ४५, रा. तोनदे, मराठवाडी) हे रविवारी सकाळी सुमारे आठच्या सुमारास रामआळी येथील एटीएमसमोरील मोकळ्या जागेत झोपले होते. यावेळी संशयित आरोपी स्वप्निल पाटील तेथे आला आणि भारती यांना झोपेतून उठवत ‘येथून निघून जा’ असे सांगितले. यावर ‘तू मला सांगणारा कोण?’ असा सवाल केल्याचा राग मनात धरून आरोपीने भारती यांना अर्वाच्च शिवीगाळ करत वाद घातला. क्षणातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपीने हाताने व थापटाने मारहाण केल्यानंतर जवळच पडलेला स्टीलचा पाईप उचलून भारती यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात मंगेश भारती यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर जखमी भारती यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच रविवारी दुपारी ३.११ वाजता पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेतली. या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ११८(२), २१५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

