(संगमेश्वर / एजाज पटेल)
उपवर मुला-मुलींसाठी स्थळ शोधण्याच्या कार्यक्रमाला वेग आला असला, तरी या प्रक्रियेत गावी शेती करणारी मुले यंदाही उपेक्षितच राहण्याची शक्यता आहे. नोकरी करणारे किंवा व्यावसायिक वर प्राधान्यक्रमात असल्याने शेतकरी वरांना कारभारीण मिळणे कठीण होत चालले आहे. वधू-वर संशोधन केंद्रांमध्येही आता सुगीचे दिवस आले असून “वधू पाहिजे” म्हणून नवरदेवांची नोंदणी कमालीची वाढत आहे. विशेष म्हणजे, वराकडील मंडळी दोन्ही बाजूंचा पूर्ण खर्च करण्याची तयारीही दर्शवत आहेत.
अलीकडे जोडीदार निवडताना “शेती हवी, जमीन हवी; पण शेतकरी नवरा नको” अशी मानसिकता वाढताना दिसते. यामुळे सामाजिक समस्यांची गुंतागुंत वाढली आहे. तर यामुळे अशा प्रत्येक घरात तणावग्रस्त वातावरण आहे. उच्चशिक्षित मुली आणि त्यांचे पालक सरकारी किंवा शहरातील खासगी नोकरी करणाऱ्या, तसेच गावी थोडीफार शेती, मात्र शहरात नोकरी करणाऱ्या वरांनाच पसंती देत आहेत. सध्या एकवेळ पगार कमी असला तरी चालेल पण शहरात राहणारा मुलगा हवा, अशी अपेक्षाही केली जात आहे.
पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा समाजमान्य क्रम होता. आज मात्र उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि शेतीला कनिष्ठ दर्जा दिला जात असल्याचे चित्र आहे.
मुलींच्या अपेक्षा अनेक पटीने वाढल्या आहेत. उच्चशिक्षित, निर्व्यसनी, घरंदाज आणि चांगले कमावता असणारा वर असावा, अशी त्यांची अपेक्षा असते. यामुळे शेतकरी व शेतमजूर वरांची मोठी कोंडी होत आहे. शहरात असणाऱ्या मुलांपेक्षाही त्यांची कमाई जास्त असली तरी त्यांच्या पदरी निराशा येत आहे.
राजकीय आणि सरकार दरबारी उदासीनतेचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पूर्वी शेतीला समाजात प्रतिष्ठा होती; मात्र आज शेती व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. शेतकऱ्यांच्या मुलींनी वडिलांचे काबाडकष्ट आणि शेतीची होत असलेली वाताहत जवळून पाहिलेली असते. त्यामुळेच अनेक मुलींना शेतकरी नवरा नकोसा वाटतो. ही सामाजिक समस्या निर्माण होण्यामागे पालकांसह मुलींच्या वाढत्या अपेक्षा, सोशल मिडिया ट्रेंडही तितकाच कारणीभूत असल्याचे जाणकारांचे मत आहे. बदलती जीवनशैली, शिक्षणाची दिशा, नोकरीच्या संधी आणि सामाजिक अपेक्षा यामुळे लग्नव्यवस्थेचे गणित झपाट्याने बदलत आहे. मात्र किमान आतातरी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.
एकीकडे मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातही मुली उच्चशिक्षित होत असून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू लागल्या आहेत. त्यामुळे जोडीदार निवडताना त्यांची अपेक्षा अधिक स्पष्ट आणि ठाम झाली आहे. स्थिर नोकरी, निश्चित उत्पन्न, शहरी राहणीमान आणि सुरक्षित भविष्य या बाबींना प्राधान्य दिले जात आहे. केवळ घर, शेती किंवा पारंपरिक व्यवसाय यावर लग्न ठरवण्याची मानसिकता आता मागे पडली आहे.
दुसरीकडे मुलांच्या बाबतीत मात्र शिक्षण, करिअर आणि जबाबदारी यामध्ये अपेक्षित गती दिसत नाही. अनेक तरुण शिक्षण अर्धवट सोडून बसलेले किंवा अस्थिर नोकरीत अडकलेले आहेत. यामुळे “मुलगा चांगला आहे” ही जुनी ओळख पुरेशी ठरत नाही. आज मुलगा काय करतो, किती कमावतो, घरदार आणि पुढे काय करणार आहे, हे प्रश्न केंद्रस्थानी आले आहेत.
शेती करणारा मुलगा कष्टाळू असला तरी त्याच्या उत्पन्नाची अनिश्चितता मुली आणि त्यांच्या पालकांच्या पसंतीस उतरत नाही. शेतकऱ्यांचे काबाडकष्ट जवळून पाहिलेल्या मुलींना तोच संघर्ष आपल्या आयुष्यात नकोसा वाटतो. परिणामी, शेती करणाऱ्या उपवर तरुणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
आजही मुलींच्या जन्माचे प्रमाण मुलांपेक्षा कमी आहे. ग्रामीण भागात मुलांपेक्षा मुली शिक्षणाकडे अधिक वळत असून त्या अधिक उच्चशिक्षित होत आहेत. परिणामी, कमी शिकलेला मुलगा त्यांच्या पसंतीस उतरत नाही. यामुळे उपवर मुलांसाठी वधू शोधताना नवरदेवांच्या कुटुंबीयांना अनेक घरी उंबरठे झिजवावे लागत आहेत. पूर्वी हे चित्र वधूपित्यांच्या बाबतीत दिसायचे; आज मात्र परिस्थिती पूर्णपणे उलटली आहे. पूर्वी मुलींसाठी वर शोधण्याची धावपळ असायची; आज मात्र अनेक ठिकाणी उलट चित्र आहे.
“मुली मिळत नाहीत” ही केवळ तक्रार न मानता तो एक सामाजिक संकेत म्हणून पाहण्याची गरज आहे. मुलांचे शिक्षण, कौशल्य, जबाबदारीची जाणीव आणि शेतीसह ग्रामीण व्यवसायांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देणे, या गोष्टींवर लक्ष दिल्याशिवाय ही कोंडी सुटणार नाही. अन्यथा ही समस्या भविष्यात आणखी तीव्र होत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

