(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शासनाच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी पायाभूत सुविधा उभी केली आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या सात महत्त्वाच्या सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्यामुळे नागरिकांना घरबसल्या पोलीस सेवांचा लाभ घेणे सुलभ झाले आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून एकूण २५ हजार ३०५ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी २२ हजार ६१२ अर्जांचा यशस्वीरीत्या निपटारा करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ, खर्च आणि कार्यालयीन फेऱ्यांचा अनावश्यक त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून या सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांना विविध प्रमाणपत्रे, परवानग्या तसेच ‘ना हरकत’ प्रमाणपत्रांसाठी आता थेट पोर्टलवर अर्ज करता येत असून, पारदर्शक व वेळबद्ध सेवा मिळत आहे.
‘आपले सरकार’ पोर्टलवर ध्वनीक्षेपक परवाना, मनोरंजन कार्यक्रमासाठी ना हरकत परवाना, शोभायात्रा परवानगी, सभा-संमेलन व मिरवणुकीची परवानगी, हत्यार परवाना व ना हरकत प्रमाणपत्र, निमशासकीय कार्यालयांतील नोकरीसाठी आवश्यक चारित्र्य पडताळणी, तसेच परदेश प्रवासासाठी आवश्यक असणारे पोलिस अनुमती प्रमाणपत्र अशा सात सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
डिजिटल प्रशासनाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल नागरिकाभिमुख सेवांचा आदर्श ठरत असून, पोलीस प्रशासन आणि नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ करण्यास मदत करत आहे.

