(लोणावळा)
कार्यालयात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेले परेश हटकर (वय 38) यांचा मृतदेह लोणावळ्याजवळील लायन्स पॉईंट येथील सुमारे 700 फूट खोल दरीत आढळून आला. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शुक्रवारपासून होते बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार सकाळी (दि. 2 जानेवारी 2026) परेश हटकर हे कार्यालयात जात असल्याचे सांगून घरातून निघाले होते. मात्र ते घरी परतले नाहीत. शनिवारी दुपारी आतवणचे पोलीस पाटील संतोष मरगळे यांनी सोशल मीडिया ग्रुपवर मिसिंग तक्रार आणि हटकर यांचा फोटो शेअर केला होता. त्याचवेळी लायन्स पॉईंट परिसरात कालपासून त्यांची कार उभी असल्याची माहिती समोर आली.
मोबाईल आणि कारमुळे संशय बळावला
हटकर यांचा मोबाईल फोन सुरू असून टॉवर लोकेशन पाली परिसरात दाखवत असल्याची माहितीही पुढे आली होती. काही वेळानंतर आय.एन. शिवाजी परिसरात केवळ मोबाईल फोन सापडल्याची खबर मिळाली. तो फोन लायन्स पॉईंट परिसरातच आढळल्याने दरीत पडल्याचा संशय अधिक बळावला.
रेस्क्यू टीमची तातडीची कारवाई
यानंतर शिवदुर्ग रेस्क्यू टीमने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याला माहिती देत तातडीने शोधमोहीम सुरू केली. मृताचे नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले होते. मोबाईल सापडलेल्या ठिकाणापासून शोध घेत रोपच्या सहाय्याने सुमारे 700 फूट खोल दरीत उतरल्यानंतर मृतदेह आढळून आला.
चार तासांचे रेस्क्यू ऑपरेशन
रविवारी दुपारी सुमारे तीन वाजता रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. सुमारे चार वाजता मृतदेह आढळल्याची खात्री झाली. दरीत उतरून मृतदेह सुरक्षितपणे वर आणण्यासाठी जवळपास चार तास लागले. शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर मृतदेह पोलिसांच्या आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे लोणावळा परिसरात शोककळा पसरली असून, पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.

