(मंडणगड- रत्नागिरी /प्रतिनिधी)
मंडणगड तालुक्यातील दहिंबे येथील आदिवासीवाडीत घडलेल्या गाजलेल्या खून प्रकरणात खेड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय (वर्ग–१) यांनी सहा महिलांची निर्दोष मुक्तता केली आहे. पुरावे अपुरे आणि साक्षीदारांच्या जबाबांत आढळलेल्या विसंगती लक्षात घेऊन हा निकाल देण्यात आला.
२२ मे २०१८ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रेखा लक्ष्मण मुकना या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दहिंबे येथील आदिवासीवाडीत घडली होती. या घटनेप्रकरणी मयत रेखा मुकना यांची मुलगी निशा नितीन मोरे हिने मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्रेमसंबंधांतील गैरसमजातून आरोपींनी संगनमताने मारहाण करून रेखा मुकना यांचा खून केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
या प्रकरणात संगिता शांताराम जाधव, शोभा सुरेश मुकना, चंद्री सहदेव मुकना, योगिता योगेश जाधव, वत्सला शंकर जाधव आणि भागी प्रकाश मुकना (सर्व रा. दहिंबे, ता. मंडणगड) यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ४५२, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र साक्षीदारांच्या जबाबांमध्ये अनेक ठिकाणी परस्परविरोधी व विसंगत बाबी आढळून आल्याने अभियोजन पक्षाचा दावा संशयाच्या भोवऱ्यात सापडला. आरोपींच्या वतीने ॲड. अश्विन शहू भोसले यांनी प्रभावी व सखोल युक्तिवाद मांडत अभियोजनातील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि सादर पुरावे तपासल्यानंतर, पुराव्याअभावी आरोप सिद्ध न झाल्याचे नमूद करत मा. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी सर्व सहा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश दिला. या खटल्याच्या कामकाजात ॲड. सिध्दी खेडेकर, ॲड. प्रिती भेकरे आणि ॲड. अंकिता गमरे यांनीही सहकार्य केले.

