(मुंबई)
सध्याच्या काळात तणावपूर्ण आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून अनेक आजारांना लोक बळी पडत आहेत. गेल्या काही वर्षांत ‘थॅलेसिमिया’ हा रक्ताचा अनुवंशिक आजार मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. या आजाराविरोधात जनजागृतीसाठी आता राज्य सरकारकडून विशेष मोहिम राबवली जाणार आहे.
थॅलेसिमिया या गंभीर आजाराबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मंत्रालयात भेट घेत राज्य सरकारला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. या भेटीत ‘थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ या अभियानाबाबत सविस्तर चर्चा झाली.
“थॅलेसिमिया रोखण्यासाठी लोकचळवळ हवी” — आरोग्यमंत्री
थॅलेसिमियावर नियंत्रण आणण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. ते म्हणाले, “थॅलेसिमिया हा गंभीर आजार आहे. त्यावर मात करण्यासाठी समाजातील सर्व घटक, संघटना, सेवाभावी संस्था आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी एकत्र आले पाहिजे. या अभियानाला लोकचळवळीचं स्वरूप मिळालं पाहिजे आणि जागरूकता तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे.”
जॅकी श्रॉफ होणार ‘सदिच्छादूत’?
जॅकी श्रॉफ हे गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून थॅलेसिमिया जनजागृतीसाठी कार्यरत आहेत. त्यांनी या आजाराविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. दरम्यान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि जॅकी श्रॉफ यांच्या भेटीत राज्य शासनाच्या ‘थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ अभियानासाठी जॅकी श्रॉफ यांची ‘सदिच्छादूत’ (Brand Ambassador) म्हणून नियुक्ती करण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीस राज्य रक्त संक्रमण परिषदेचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम पुरी, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षप्रमुख मंगेश चिवटे तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

