(रत्नागिरी)
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून, देशातील तिसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष असलेली बहुजन समाज पार्टीही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये बसपा स्वबळावर लढणार असल्याची स्पष्ट भूमिका पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रविण मर्चंडे यांनी मांडली.
सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टीची महाराष्ट्र प्रदेश कमिटीची बैठक मुंबईतील चेंबूर येथील ‘बीएसपी भवन’ येथे पार पडली. या बैठकीस राष्ट्रीय प्रभारी माजी खासदार राजाराम साहेब, प्रदेश अध्यक्ष सुनील डोंगरे उपस्थित होते. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावती यांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला.
प्रविण मर्चंडे यांनी सांगितले की, वरिष्ठ नेत्यांच्या सूचनांनुसार बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार असली तरी महाराष्ट्रातील अलीकडील निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांशी सकारात्मक चर्चा केली जाऊ शकते. महानगरपालिका निवडणुकांमध्ये विरोधी उमेदवारांवर दबाव, धनशक्तीचा वापर आणि अर्ज मागे घेण्यासाठी होणारे प्रयत्न पाहता बहुजन समाजातील बौद्ध, कुणबी-ओबीसी, अनुसूचित जमाती आणि मुस्लिम समाजाची मते विभागली जाऊ नयेत, हा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत बसपाने शिवसेना (उबाठा), वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) यांच्यासोबत मिळून निवडणूक लढवत चांगली ताकद दाखवली होती आणि दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती, याची आठवण त्यांनी करून दिली.
महाराष्ट्र प्रभारी राजपाल गावंडे, कोकण झोन प्रभारी संतोष कासारे, झोन प्रभारी सचिन रुके, रत्नागिरी-सिंधुदुर्ग प्रभारी सचिन मोहिते तसेच जिल्हा व विधानसभा कमिटीच्या मार्गदर्शनाखाली बसपा प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर सक्षम पर्याय उभा करेल. बहुजन समाजातील महापुरुषांच्या समता आणि बंधुत्वाच्या विचारांवर पक्ष निश्चितपणे पुढे जाईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष प्रविण मर्चंडे यांनी व्यक्त केला.

