(छत्रपती संभाजीनगर)
बारावीच्या परीक्षा केंद्रांवरील कारवाईवरून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि शैक्षणिक संस्थांमधील वाद अधिकच तीव्र झाला आहे. कॉपीमुक्त अभियानांतर्गत गैरप्रकार आढळल्याच्या कारणावरून छत्रपती संभाजीनगर विभागातील २८ परीक्षा केंद्रे रद्द करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला होता. मात्र, उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द ठरवत केंद्रे पूर्ववत करण्याचे आदेश दिले, तरीही मंडळाने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
फेब्रुवारी–मार्च २०२५ दरम्यान होणाऱ्या बारावी परीक्षेत काही केंद्रांवर कॉपीचे प्रकार आढळल्याचा ठपका ठेवत मंडळाने २८ केंद्रांवर कारवाई केली होती. या निर्णयाविरोधात छत्रपती संभाजीनगर विभागातील ११ कनिष्ठ महाविद्यालयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. केवळ एका विद्यार्थ्याकडे कॉपी आढळली म्हणून संपूर्ण परीक्षा केंद्र रद्द करणे हे मनमानी व अन्यायकारक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. यासंदर्भात कोल्हापूर आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालांचा आधार घेत मंडळ सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला
उच्च न्यायालयाने परीक्षा केंद्रे पूर्ववत करण्याचे आदेश दिले असले, तरी त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. परीक्षेला अवघे पाच दिवस शिल्लक असताना विद्यार्थ्यांना अजूनही जुनीच प्रवेशपत्रे मिळालेली आहेत. परिस्थिती बदलल्यास पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असे मंडळाकडून सांगण्यात आले असले, तरी विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संभ्रम कायम आहे.
संस्थाचालकांचा संताप
दरम्यान, शैक्षणिक संस्थाचालकांनी मंडळाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांत जिथे एकही कॉपीचा प्रकार आढळलेला नाही, अशा लहान व शिस्तबद्ध संस्थांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. उलट, ज्या ठिकाणी सामूहिक कॉपीचे गंभीर प्रकार घडले, ती केंद्रे अद्याप सुरू असल्याचा दावाही संस्थाचालकांकडून करण्यात आला आहे. न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांनंतरही केंद्रे पूर्ववत न झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बारावी परीक्षेच्या तोंडावर सुरू असलेल्या या कायदेशीर संघर्षामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येऊ नये, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

