(रत्नागिरी /प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवून चालकांना मार्गदर्शन, प्रशिक्षण व विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असल्या तरी एसटी अपघातांची संख्या घटण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र रत्नागिरी विभागात दिसून येत आहे. गतवर्षी (२०२४) रत्नागिरी विभागांतर्गत एसटीच्या १७३ अपघातांची नोंद झाली होती, तर वर्ष २०२५ मध्ये ही संख्या वाढून १८२ वर पोहोचली आहे.
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महामंडळाकडून चालकांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात. नव्याने भरती झालेल्या चालकांना ४८ दिवसांचे सेवापूर्व प्रशिक्षण देण्यात येते. तसेच नियमित कालावधीनंतर उजळणी प्रशिक्षणही आयोजित केले जाते. ज्या चालकांच्या हातून अपघात घडले आहेत, अशा चालकांना तातडीने ११ दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात येते. शिवशाही बस चालकांसाठी स्वतंत्रपणे तीन दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. सुरक्षेच्या दृष्टीने चालकांची वैद्यकीय व नेत्रतपासणी करण्यात येते. ४० वर्षांखालील चालकांची वर्षातून एकदा, तर ४० वर्षांवरील चालकांची दरवर्षी तपासणी केली जाते. यासोबतच चालकांचे समुपदेशन (कौन्सिलिंग)ही करण्यात येते. मद्यप्राशन करून वाहन चालविण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक आगारात अल्कोहोल टेस्ट मशीन उपलब्ध करून देण्यात आली असून, चालकांची नियमित तपासणीही केली जाते.
रत्नागिरी विभागांतर्गत ७११ बसेसद्वारे दररोज सुमारे ४,५०० फेऱ्या चालविल्या जात असून, त्यातून दोन ते अडीच लाख प्रवाशांची दैनंदिन वाहतूक होते. सुरक्षित प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी विनाअपघात सेवा देणाऱ्या चालकांना प्रोत्साहनपर पारितोषिकेही दिली जातात. तरीही वर्ष २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये किरकोळ व प्राणांतिक अपघातांची संख्या काहीशी घटली असली, तरी गंभीर अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याने ही बाब महामंडळासह प्रवाशांसाठीही चिंतेची ठरत आहे. सातत्याने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांनंतरही अपघात रोखण्यात अपेक्षित यश न मिळाल्याने, अपघातांची कारणे शोधून अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

