(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील आठवडा बाजारानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरपरिषदेने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार संपल्यानंतर रात्रीच्या वेळी दोन घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात येणार असून, एक घंटागाडी मुख्य रस्त्यावर तर दुसरी बाजाराच्या आतल्या भागात ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक व्यावसायिकाने आपला कचरा घंटागाडीतच टाकणे बंधनकारक असेल. सुरुवातीला नगरपरिषदेच्या वतीने दोन वेळा निरीक्षण करण्यात येणार असून, तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी दिला आहे.
शनिवारी (दि. ३) नगराध्यक्षा सुर्वे यांनी आठवडा बाजार परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत स्वच्छतेबाबत सूचना दिल्या. त्यांच्या समवेत नगरसेविका प्रीती सुर्वे तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. सध्या आठवडा बाजार संपल्यानंतर अनेक विक्रेते कचरा तिथेच टाकून निघून जात असल्याने परिसरात अस्वच्छता पसरत असल्याचे चित्र आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठीच नगरपरिषदेने ही व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे नगराध्यक्षा सुर्वे यांनी स्पष्ट केले.
बाजार बंद झाल्यानंतर प्रत्येक विक्रेत्याने आपल्याजवळील कचरा घंटागाडीत टाकूनच बाहेर पडावे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. रत्नागिरी शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी नागरिकांसह व्यापाऱ्यांनीही जबाबदारीने सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी यावेळी केले.

