(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत बँकेच्या संरचनेत महत्त्वपूर्ण बदलांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. संचालकांच्या जागांमध्ये वाढ करून ती संख्या २१ वरून २५ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासंदर्भातील प्रस्ताव सहकार खात्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर बँकेचे भागभांडवल ७५ कोटींवरून १२५ कोटींवर नेण्यासही सभेने संमती दर्शवली.
मराठा मंडळाच्या सभागृहात जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडली. सभेच्या पटलावर मांडण्यात आलेले सर्व विषय अल्पावधीतच, अवघ्या पंधरा मिनिटांत मंजूर करण्यात आले. शासनाच्या सहकार विभागाच्या नव्या धोरणानुसार बँकेच्या पोटनियमांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दुरुस्त्यांनुसार, बँकेच्या निवडणूक प्रक्रियेतही बदल होणार असून विविध मतदार संघांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. सध्या एकत्र असलेले काही मतदार संघ विभाजित करून स्वतंत्र गट निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषीपणन व शेतमाल प्रक्रिया संस्था आणि सर्वसाधारण व्यक्ती यांचे स्वतंत्र मतदार संघ तयार केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे गृहनिर्माण व गृहतारण सहकारी संस्था आणि पगारदार नोकरांच्या संस्था यांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे. याशिवाय, मजूर संस्था, स्वयंरोजगार व हमाल कामगार संस्था, तसेच औद्योगिक वाहतूक, उत्पादक व मच्छीमार सहकारी संस्था यांचेही स्वतंत्र मतदार संघ निश्चित करण्याचा प्रस्ताव सभेत मंजूर करण्यात आला. या बदलांमुळे बँकेच्या प्रशासनात अधिक व्यापक आणि समतोल प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, ग्राहकांना दिलासा देणारा आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत, सोने-चांदीच्या दागिन्यांवरील कर्जमर्यादा १० लाखांवरून २० लाखांपर्यंत वाढवण्यासही सभेने संमती दिली. यासंदर्भातील पोटनियम दुरुस्तीचा प्रस्ताव लवकरच सहकार खात्याकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. चोरगे यांनी दिली. या निर्णयांमुळे जिल्हा बँकेच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन विविध घटकांना अधिक प्रभावी प्रतिनिधित्व आणि आर्थिक सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

