(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे शतकानुशतकांपासून चालत आलेली “एक गाव, एक गणपती” ही परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. गणेश चतुर्थीच्या दिवशी (बुधवार, २७ ऑगस्ट) पंचक्रोशीतील स्थानिक भाविकांना स्वयंभू श्रींच्या मंदिरात थेट गाभाऱ्यात जाऊन स्पर्श (चरण) दर्शनाचा लाभ मिळाला.
गणपतीपुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ आपल्या घराघरांत गणेशमूर्ती न बसवता, मंदिरातील स्वयंभू श्रींच्या प्रतिमेसमोरच गणेशोत्सव साजरा करतात. या परंपरेनुसार पहाटे मंदिर उघडून मुख्य पुजारी प्रभाकर घनवटकर आणि अमित घनवटकर यांनी श्रींची पूजा, अर्चा आणि मंत्रपुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर आरती संपन्न होऊन स्थानिक ग्रामस्थांना साध्या कपड्यांमध्ये गाभाऱ्यात प्रवेश देऊन स्पर्शदर्शन देण्यात आले.
या वेळी भाविकांनी श्रीफळ, फुले अर्पण करून श्रींच्या चरणी आपली गाऱ्हाणी मांडली. विशेष म्हणजे स्थानिक प्रथेनुसार श्रींच्या पूजेतील फुलोरा व तीर्थ घरामध्ये आणून त्याची पूजा केली जाते. तीर्थ प्राशन करून घरभर शिंपडले जाते, उरलेले तीर्थ विहिरीत सोडले जाते.
सकाळच्या या पवित्र विधीनंतर दिवसभर वातावरण भजनी मंडळांच्या गजराने भक्तिमय झाले. दर्शन व्यवस्थेसाठी देवस्थान समितीने सुयोग्य नियोजन केले होते. दर्शन रांग व्यवस्थापनासाठी देवस्थानचे रक्षक व गणपतीपुळे पोलिस ठाण्याचे कर्मचारी तैनात होते.
पालखी सोहळा
सायंकाळी साडेचार वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात संपन्न झाली. या मिरवणुकीत पंचक्रोशीतील ग्रामस्थ, देवस्थान समितीचे पंच, पुजारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

