(रत्नागिरी)
कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर, रत्नागिरी या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक ३१ डिसेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडले. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्री. मुरकुटे व रा.भा. शिर्के प्रशालेच्या निवृत्त मुख्याध्यापिका सौ.गुळवणी उपस्थित होत्या. या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून शालेय समितीचे चेअरमन श्री. पाटणकर उपस्थित होते. तसेच रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक १५ चे मुख्याध्यापक व केंद्र समन्वयक श्री. मोटे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजवाडे, बालवाडी विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. लाड, श्री. ऐवळे, पालक प्रतिनिधी आदि मान्यवर उपस्थित होते.
स्नेहसंमेलनानिमित्ताने शाळेच्या ‘ज्ञानदीप’ हस्तलिखिताचे प्रकाशन पाहुण्यांचा हस्ते करण्यात आले. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कर्तृत्ववान महिला पुरस्कार श्रीम. कामिनी महाडिक यांना प्रदान करण्यात आला. इयत्ता चौथीतील मीरा झगडे, ओवी आंबेकर व उर्वी कळंबटे या विद्यार्थिनींना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे या निमित्ताने शाळेमध्ये पालकांसाठी रंगावली व शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा घेऊन त्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांचा, शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचा व देणगीदार पालक व माजी विद्यार्थी यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
तीन दिवस चाललेल्या या स्नेहसंमेलनात बालवाडी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. विशेष म्हणजे शिक्षक व पालकांनी देखील दर्जेदार कार्यक्रम सादर करुन सर्वांची वाहवा मिळवली. चौथ्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ राजवाडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तम सहकार्य करून हा सोहळा यशस्वीपणे पार पाडला.

