( मुंबई )
‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५’ (NFHS-5) च्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील 52.2 टक्के गर्भवती महिला अॅनिमियाने ग्रस्त आहेत. ही बाब केवळ मातांच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठीही गंभीर चिंता निर्माण करणारी आहे.
NFHS-4 (2015-16) च्या तुलनेत NFHS-5 (2019-21) मध्ये गर्भवती महिलांमधील अॅनिमियाचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. हिमोग्लोबिनची कमतरता हे माता मृत्यूदराचे एक महत्त्वाचे कारण ठरत असून, यामुळे वेळेआधी प्रसूती आणि जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी असण्याचा धोका वाढतो.
महाराष्ट्रातही चिंताजनक स्थिती
महाराष्ट्रात 45 ते 50 टक्के गर्भवती महिला अॅनिमियाने त्रस्त असल्याचे आढळले आहे. राज्यात ‘अॅनिमियामुक्त भारत’ मोहिमेअंतर्गत लोहाच्या गोळ्यांचे वाटप केले जात असले तरी संतुलित आणि पौष्टिक आहाराबाबत अजूनही मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अॅनिमियाची प्रमुख कारणे
असंतुलित आहार, पौष्टिक अन्नाचा अभाव, वारंवार गर्भधारणा, कमी अंतराने प्रसूती, किशोरवयात विवाह तसेच अपुरी आरोग्यसेवा ही अॅनिमियाची मुख्य कारणे आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये ही समस्या अधिक तीव्र स्वरूपात दिसून येते. अॅनिमियावर उपचार करताना त्याची तीव्रता ओळखणे महत्त्वाचे ठरते. सौम्य अॅनिमियामध्ये तोंडावाटे दिली जाणारी लोहयुक्त पूरक औषधे प्रभावी ठरतात, तर गंभीर प्रकरणांमध्ये विशेष उपचारांची गरज भासते.
अॅनिमियामागील वैद्यकीय कारणे
- आहारातील अडथळे: तृणधान्यांमधील फायटेट्स लोह शोषणात अडथळा आणतात
- जीवनचक्रातील कमतरता: किशोरवयातच अॅनिमिया असल्याने गर्भधारणेदरम्यान लोहसाठा अपुरा राहतो
- आजार व संसर्ग: जंतुसंसर्ग, मलेरिया यामुळे लोहाची झपाट्याने कमतरता होते
- रक्तविकार: मासिक पाळीतील अतिरक्तस्राव किंवा वॉन विलेब्रँडसारखे विकार
राज्यानुसार गर्भवती महिला अॅनिमियाची स्थिती
- लडाख: 78.1 टक्के
- बिहार: 63.1 टक्के
- गुजरात: 62.6 टक्के
- पश्चिम बंगाल: 62.3 टक्के
- मिझोराम: 27.9 टक्के
- नागालँड: 22.2 टक्के
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, अॅनिमियावर नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ औषधोपचार नव्हे तर पोषण, शिक्षण आणि प्राथमिक आरोग्यसेवा मजबूत करणे तितकेच आवश्यक आहे.

