(रत्नागिरी)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील गरजू बालकांसाठी विशेष मोफत बालशस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष (रत्नागिरी), राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) आणि बीकेएल वालावलकर रुग्णालय, सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, २१ जुलै आणि बुधवार, २२ जुलै रोजी हे शिबिर वालावलकर रुग्णालयात आयोजित करण्यात येणार आहे.
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबईतील प्रख्यात बालशल्यचिकित्सक (Pediatric Surgeon) डॉ. पारस कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांवरील विविध गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या आजारांवरील शस्त्रक्रिया होणार मोफत
शिबिरादरम्यान बालकांवरील विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यामध्ये पोटाशी संबंधित आजार व शस्त्रक्रिया, जन्मजात विकारांवरील शस्त्रक्रिया, नवजात बालकांवरील आवश्यक शस्त्रक्रिया, लघवीच्या आजारांवरील शस्त्रक्रिया, शरीरावरील गाठी व सूज काढण्याच्या शस्त्रक्रिया, अपेंडिक्स आणि हर्नियावरील शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे.
आवश्यक कागदपत्रे
शिबिराचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी बालक आणि त्यांच्या पालकांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्यामध्ये रेशन कार्ड, आधार कार्ड (ओळख व पत्त्याचा पुरावा) याचा समावेश असावा. मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी तातडीने नाव नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी तथा अध्यक्ष डॉ. सुमित सावंत यांनी केले आहे.
संपर्क क्रमांक : ८८४७७९०१४९, ९२७२८९७८३४, ९९२२५६६६३९
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील बालकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून दर्जेदार शस्त्रक्रिया आणि उपचार विनामूल्य उपलब्ध होणार असून, अनेक बालकांच्या आरोग्याला नवी संजीवनी मिळणार आहे.

