(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरात माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना रविवारी सकाळी घडली. शहरातील एका बँकेबाहेर फुटपाथवर झोपलेल्या एका निराधार फिरस्त्या व्यक्तीवर बँकेच्या सुरक्षारक्षकाने स्टीलच्या रॉडने अमानुष व जीवघेणा हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरातील राम आळी परिसरातील एका बँकेबाहेर असलेल्या मोकळ्या पॅसेजमध्ये मंगेश भारती (तोणदे) हे शनिवारी रात्री झोपले होते. रविवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास बँकेचा सुरक्षारक्षक स्वप्निल पाटील (रा. वायंगणी) कर्तव्यावर असताना त्याने मंगेश भारती यांना तेथून उठून जाण्यास सांगितले. मात्र, मंगेश उठण्यास तयार नसल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला.
या वादाचे पर्यवसान क्षणातच भीषण हाणामारीत झाले. संतापाच्या भरात सुरक्षारक्षकाने जवळच असलेला स्टीलचा रॉड उचलून मंगेश भारती यांच्यावर बेछूट प्रहार करण्यास सुरुवात केली. हल्ला इतका अमानुष होता की मंगेश यांच्या डोक्यातून व शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला. हा थरारक प्रकार प्रत्यक्षदर्शींनी पाहताच परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंगेश भारती यांना पोलिसांनी तत्काळ रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पोलिसांनी हल्ला करणाऱ्या स्वप्निल पाटील याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे शहरात तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. केवळ झोपल्याच्या कारणावरून एका निराधार व्यक्तीवर असा निर्दयी आणि जीवघेणा हल्ला होणे, याबाबत नागरिकांतून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शहर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

