(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
खेड तालुक्यातील चिरणी (वरची वाडी) येथील प्रतिष्ठित व सर्वपरिचित ग्रामस्थ मधुकर सदाशिव आंब्रे यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्षे होते. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
कै. मधुकर आंब्रे हे स्वभावाने अतिशय प्रेमळ, मनमिळावू आणि परोपकारी होते. समाजातील गरजू व्यक्तींना मदत करण्याची त्यांची नेहमीच तत्परता असे. गावातील सामाजिक, धार्मिक व कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या सुस्वभावामुळे आणि दिलदारपणामुळे ते सर्वांच्या आदराचे स्थान होते.
त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच विवाहित मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

