(नाणीज / वार्ताहर)
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य, रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम यांच्या आध्यात्मिक प्रेरणेने व नेतृत्वाखाली देशभरात मानवतेच्या सेवेस समर्पित असा ‘जीवनदान महाकुंभ’ महारक्तदान उपक्रम राबविण्यात येत आहे.
दि. ४ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत सलग १५ दिवसांत देशातील नऊ राज्यांमध्ये १४६० ठिकाणी महारक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, या माध्यमातून लाखो रक्तकुपिका संकलनाचा संकल्प करण्यात आला आहे.
या उपक्रमात महाराष्ट्र, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान तसेच दादरा-नगर हवेली व दमण-दीव या राज्यांचा समावेश आहे.
जानेवारी ते मार्च या कालावधीत देशात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवतो. ही सामाजिक गरज ओळखून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा भव्य महारक्तदान उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. “अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून राष्ट्रसेवेत सहभागी व्हावे,” असे आवाहन जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांनी केले आहे.
या शिबिरांत संकलित होणारे रक्त राज्य रक्त संक्रमण सेवा अंतर्गत शासकीय व अधिकृत रक्तपेढ्यांमार्फत गरजू रुग्णांपर्यंत वितरित करण्यात येणार आहे. या रक्तदानाचा थेट लाभ मायक्रोसाइटिक ॲनिमिया, सिकलसेल, थॅलेसिमिया, हिमोफिलिया, रक्तकर्करोग, किडनी फेल्युअर आदी गंभीर आजारांनी ग्रस्त तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना होणार आहे. शासकीय रुग्णालयांतील रुग्णांसाठीही हा उपक्रम जीवनदायी ठरणार आहे.
रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधामच्या परंपरेत रक्तदान हे केवळ सामाजिक कार्य नसून विशिष्टाद्वैत तत्त्वज्ञानावर आधारित सजीव उपासना मानली जाते. “प्रत्येक जीवात ईश्वर आहे; त्यामुळे जीवसेवा हीच ईश्वरसेवा” या तत्त्वज्ञानातून रक्तदानासह अन्नदान, शिक्षण, आरोग्यसेवा व पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम गेली २५ वर्षांहून अधिक काळ सातत्याने राबविले जात आहेत.
रक्तदानाची उल्लेखनीय कामगिरी :
• २००३ – नाशिक कुंभमेळ्यात १० तासांत ६,४९० रक्तकुपिका
• २०१६ – ७०० शिबिरे, ६५,४८७ रक्तकुपिका
• २०१७ – २५,५८३
• २०१८ – ५०,०००
• २०१९ – ६०,८९८
• २०२४ – ८१,१०७
• २०२५ – केवळ १५ दिवसांत १,३६,२७२ रक्तकुपिका
“रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. परमेश्वराने दिलेला अमूल्य ठेवा मानवतेच्या रक्षणासाठी अर्पण करणे हीच खरी भक्ती,” असा संदेश देत रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधामने सेवा, श्रद्धा व अध्यात्म यांचे एकात्म दर्शन समाजासमोर ठेवले आहे.

