(सोलापूर)
राज्यभरात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्या. मात्र, सोलापुरात निवडणुकीचं राजकारण थेट हिंसक वळणावर गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपच्या दोन गटांतील तीव्र वादातून एका तरुणाची हत्या झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाळासाहेब सरवदे हे मनसे विद्यार्थी सेनेचे शहरअध्यक्ष होते.
ही घटना सोलापूर महापालिका प्रभाग क्रमांक 2 अंतर्गत येणाऱ्या जोशी गल्ली परिसरात घडली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून भाजपच्या दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे यांचे संपर्क कार्यालय फोडण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे. भाजपच्या दोन गटात झालेल्या वादात ‘समाज आपला एक आहे, भांडण कशाला करता, एकमेकांना समजून घ्या’ अशी समजूत काढण्यासाठी गेलेले बाळासाहेब सरवदे यांची चाकूने भोसकून खून करण्यात आला, असा आरोप मनसेनं केला आहे.
मध्यस्थी करायला गेले, पण जीव गमावला
या राजकीय वादात बाळासाहेब सरवदे (वय अंदाजे …) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. बाळासाहेब सरवदे हे मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी होते. वाद शांत करण्यासाठी ते घटनास्थळी गेले असताना, शिंदे गटाच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सोलापूर येथील सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
उमेदवारी माघारीवरून वाद
प्रभाग क्रमांक 2 मध्ये शालन शिंदे या भाजपच्या अधिकृत उमेदवार असून, त्यांच्याविरोधात रेखा सरवदे यांनी बंडखोर म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप सरवदे कुटुंबाकडून करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर दोन गटांमध्ये वाद चिघळल्याचे सांगितले जात आहे.
चार संशयित ताब्यात, शोध सुरू
या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्याने चार संशयितांना ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेनंतर महापालिका परिसरात आणि संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राजकीय दबावाचे आरोप
या प्रभागातून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. मनसेचे लोकसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत इंगळे यांनी आरोप केला की, “समाजात वाद होऊ नये म्हणून बाळासाहेब सरवदे मध्यस्थीसाठी गेले होते. मात्र त्यांची हत्या करण्यात आली.”
या घटनेमुळे सोलापुरात निवडणूक काळात राजकीय हिंसाचाराचा गंभीर मुद्दा ऐरणीवर आला आहे. हत्या नेमकी कशी आणि कोणाच्या सहभागातून झाली, याचा तपास पोलीस करत असून पुढील कारवाई अपेक्षित आहे.

