( कोल्हापूर )
महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत मंदिरांचे पुजारी हे देवतेचे निष्ठावान सेवक म्हणून ओळखले जातात. मात्र कोल्हापुरात हेच पुजारी आता घंटा आणि पूजापात्र बाजूला ठेवत क्रिकेटच्या मैदानात बॅट-बॉलसह उतरले आहेत. कोल्हापूर येथील शास्त्रीनगर मैदानावर १४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान सुरू असलेल्या ‘मंदिर प्रीमियर लीग’ पर्व–२ या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमुळे शहरात वेगळ्याच उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
राज्यभरातील १२ प्रसिद्ध मंदिरांचे तब्बल २५० हून अधिक पुजारी, मंदिर कर्मचारी आणि अधिकारी या स्पर्धेत सहभागी झाले असून धर्म आणि खेळ यांचा अनोखा संगम कोल्हापुरात पाहायला मिळतो आहे.
स्पर्धेचं दुसरं पर्व, यंदा राज्यव्यापी सहभाग
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिर येथील श्रीपूजक मकरंद मुनीश्वर यांनी मागील वर्षी प्रथमच मंदिरातील पुजाऱ्यांसाठी ही स्पर्धा सुरू केली होती. पहिल्या वर्षाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर यंदा ही स्पर्धा राज्यपातळीवर नेण्यात आली असून विविध जिल्ह्यांतील मंदिरांचे संघ सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन १४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूरच्या नूतन महापौर रुपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते झाले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवडी, वेदमूर्ती सुहास जोशी, महादेव दिंडे यांच्यासह स्पर्धा समितीचे अध्यक्ष मकरंद मुनीश्वर, उपाध्यक्ष लाभेश मुनीश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर डे-नाईट सामने सुरू झाले.
पंढरपूरचा संघ पहिल्यांदाच मैदानात
यंदा प्रथमच पंढरपूर येथील श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिराचे प्रतिनिधी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर पारंपरिक धोती-नेहरी वेशात क्रिकेट सराव करताना दिसले, हे दृश्य उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरले.
या स्पर्धेत श्री क्षेत्र जोतिबा, नृसिंहवाडी, अंबाबाई–महालक्ष्मी (अ व ब), ओढ्यावरचा गणपती (पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती), परशुराम सोशल फाउंडेशन, तुळजापूर (अ व ब), पंढरपूर, माहुरगड, शिर्डी, तसेच श्री महालक्ष्मी (सारसबाग, पुणे) असे एकूण १२ संघ सहभागी झाले आहेत.
उत्कंठावर्धक सामने, निष्पक्ष पंचनिर्णय
उद्घाटन सामन्यात श्री क्षेत्र जोतिबा संघाने ओढ्यावरचा गणपती संघावर ७ गडी राखून विजय मिळवला, तर परशुराम सोशल फाउंडेशनने अंबाबाई–महालक्ष्मी (ब) संघाचा ९ गडींनी पराभव केला. सामन्यांसाठी कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे प्रमाणित चार अंपायर पंचनिर्णय देत असून स्पर्धेची गुणवत्ता अधिक उंचावली आहे.
बक्षिसे, थेट प्रक्षेपण आणि विरंगुळा
स्पर्धेत प्रथम क्रमांक – ₹२५,५५५, द्वितीय – ₹२१,१११, तृतीय – ₹१५,५५५ यासह मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, शिस्तबद्ध संघ आणि सामनावीर अशी वैयक्तिक पारितोषिकेही दिली जाणार आहेत. सर्व सामने युट्युबवर थेट प्रक्षेपित होत असून पूजा-अर्चना आणि भजनकिर्तनाच्या दैनंदिन व्यापातून पुजाऱ्यांना या माध्यमातून विरंगुळा मिळत आहे.
धर्म आणि खेळाचा अनोखा संगम
“ही स्पर्धा पुजाऱ्यांमधील एकता, मैत्री आणि क्रीडानैपुण्य वाढवत आहे. पुजाऱ्यांच्या मुलांमध्येही क्रिकेटची आवड निर्माण होईल आणि त्यांच्यातील सुप्त प्रतिभेला वाव मिळेल. धर्म आणि खेळ यांचा सुंदर संगम या स्पर्धेमुळे घडतो आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत रोमांचक सामने पाहायला मिळतील. कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने मैदानात उपस्थित राहावं,” असे आवाहन स्पर्धा समितीचे अध्यक्ष मकरंद मुनीश्वर यांनी केले.
धार्मिक परंपरेसोबत आधुनिक खेळाचा उत्सव साजरा करणारी मंदिर प्रीमियर लीग कोल्हापुराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात नवी रंगत भरत आहे

