( मुंबई )
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अद्याप काही प्रश्न अनुत्तरित आहेत. अपघात नेमका कसा आणि का झाला, यावर स्पष्ट माहिती समोर आलेली नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत. अशातच आमदार रोहित पवार यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे या प्रकरणावरील चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे.
अपघाताबाबत प्रश्नांची मालिकाच
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर घटनाक्रम, प्रवाशांची संख्या आणि अधिकृत माहितीत असलेल्या तपशीलांबाबत पक्षातील नेत्यांनी यापूर्वीच प्रश्न उपस्थित केले आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी विमानातील व्यक्तीसंख्या आणि अपघातानंतर समोर आलेल्या माहितीत असलेल्या तफावतीकडे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर अपघाताआधी नेमकं काय घडलं, हवामान, तांत्रिक अडचणी किंवा अन्य कारणं होती का, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
अजित पवारांच्या विमान अपघाताचा सविस्तर घटनाक्रम
-
सकाळी 8.10 वाजता अजित पवार मुंबई विमानतळावरून खासगी विमानाने बारामतीच्या दिशेने रवाना
-
सुमारे 8.45 वाजण्याच्या सुमारास विमान बारामती विमान धावपट्टी परिसरात पोहोचले
-
वैमानिकाकडून लँडिंगच्या अंतिम टप्प्यावर असल्याचा संदेश
-
मात्र धावपट्टी स्पष्ट न दिसल्याने पहिल्या प्रयत्नात लँडिंग अयशस्वी
-
वैमानिकाने धावपट्टीभोवती एक फेरी मारली
-
ATC कडून विमानाच्या स्थितीबाबत विचारणा
-
धावपट्टी दिसते का, अशी वैमानिकाला विचारणा
-
सुरुवातीला धावपट्टी दिसत नसल्याचे कळवण्यात आले
-
काही सेकंदानंतर धावपट्टी दिसत असल्याचा संदेश
-
सकाळी 08:43 वाजता विमान उतरवण्याची परवानगी
-
मात्र विमानातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही
-
सकाळी 08:44 वाजता ATC कर्मचाऱ्यांना धावपट्टीजवळ आग दिसली
-
धावपट्टीच्या सुरुवातीच्या डाव्या बाजूला विमान कोसळले
-
प्रत्यक्षात 8.50 वाजता लँडिंग अपेक्षित होते.
रोहित पवार काय म्हणाले?
रोहित पवार म्हणाले, “विमानात नेमकं काय घडलं, कसं घडलं, याबाबतची माहिती 9 तारखेनंतर अधिक स्पष्टपणे मांडता येईल. आम्ही काही माहिती मागवली आहे. कोणतीही घटना घडल्यानंतर सत्य लोकांसमोर येणं महत्त्वाचं असतं. पवार कुटुंब म्हणूनच नव्हे, तर महाराष्ट्राचा नागरिक म्हणून लोकांच्या मनात असलेल्या शंकांना योग्य उत्तर मिळायला हवं.”
9 तारखेला काय उघड होणार?
रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
- त्यांच्या जवळ कोणती माहिती आहे?
- ती माहिती अधिकृत अहवालाशी संबंधित आहे का?
- अपघातामागील कारणांवर नवा प्रकाशझोत पडणार का?
या सर्व प्रश्नांची उत्तरं आता 9 तारखेकडे लागलेल्या नजरा देणार आहेत. तोपर्यंत अजित पवारांच्या विमान अपघाताबाबतची उत्सुकता आणि चर्चा कायम राहणार आहे.

