(पुणे)
ठेवीदारांची फसवणूक प्रकरणात येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय जोशी (वय ६३) यांचे शुक्रवारी सकाळी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या वर्षभरापासून ते कोठडीत होते. प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता; मात्र सुनावणी होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
उदय जोशी यांच्यावर ठेवीदारांची सुमारे ५ कोटी ७३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप होता. सदाशिव पेठेतील निनाद नागरी सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक होते. या प्रकरणात जोशी, त्यांचा मुलगा मयुरेश आणि इतर सात जणांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. सिंहगड रस्ता परिसरातील गॅस वितरण एजन्सीत गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून निधी गोळा केल्याचा आरोप असून, पैसे परत न दिल्यामुळे चार स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले होते.
या प्रकरणात उदय जोशी यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले होते; मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या पत्नी शुभदा जोशी या भाजपच्या नगरसेविका आहेत.
येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ यांनी सांगितले की, जोशी काही दिवसांपासून आजारी होते. कारागृहातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि अलीकडेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. शुक्रवारी सकाळी श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
या घटनेमुळे पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणातील पुढील न्यायालयीन प्रक्रिया जोशी यांच्या निधनानंतर कशी पुढे जाणार, याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.

