(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गेली अनेक वर्षे पशुधन पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले मनोहर ढाकणे यांची नुकतीच सहाय्यक पशुधन विकास अधिकारीपदी बढती झाली आहे. त्यांच्या या बढतीबद्दल शेतकरी, पशुपालक व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सेवाकाळात ढाकणे यांनी केवळ शासकीय कर्तव्यापुरते मर्यादित न राहता पशुपक्ष्यांप्रती असलेली निष्ठा, तत्परता व माणुसकी यांचे सातत्याने दर्शन घडवले. पाळीव जनावरांवर उपचार असोत किंवा रस्त्यावर अपघातग्रस्त, जखमी अथवा आजारी अवस्थेत सापडलेली मोकाट जनावरे याबाबत एक फोन कॉल आणि लोकेशन मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचणे हीच त्यांची ओळख बनली आहे.
रात्र असो वा दिवस, सुट्टी असो किंवा आपत्कालीन परिस्थिती, जनावरांना मदतीची गरज भासली की ढाकणे कधीही मागे हटले नाहीत. अनेक वेळा स्वतःच्या वेळेची वा सोयीची पर्वा न करता त्यांनी शेकडो जनावरांचे प्राण वाचवले आहेत. याच कार्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी व पशुपालकांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा विश्वास निर्माण झाला असून ते प्रेमाने त्यांना “जनावरांचे देव” म्हणून संबोधतात.
उपचारांसोबतच पशुपालकांना योग्य मार्गदर्शन, लसीकरणाविषयी जनजागृती तसेच रोगप्रतिबंधक उपाययोजनांवर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण व निष्ठावान सेवेला शासनाकडून मिळालेली ही बढती म्हणजे त्यांच्या कार्याचीच पावती असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
नव्या सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदावरही मनोहर ढाकणे आपली सेवा अधिक व्यापक स्तरावर आणि त्याच तळमळीने बजावतील, असा विश्वास सर्वत्र व्यक्त होत आहे.

