(चिपळूण)
‘वर्ल्ड डायबेटीस डे’ च्या पार्श्वभूमीवर चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (CGPA) तर्फे हॉटेल अतिथी ग्रँड येथे डायबेटीसवरील अद्ययावत उपचारपद्धती, रुग्ण व्यवस्थापन आणि गुंतागुंत प्रतिबंध यावर केंद्रित विशेष वैद्यकीय मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली.
अध्यक्ष डॉ. संदीप भागवत यांनी प्रास्ताविकातून भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या डायबेटीस रुग्णसंख्येचा आढावा घेतला. वेळेत निदान आणि योग्य उपचार सुरू होण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
मुख्य अतिथी डॉ. हर्षद परब (अवनीश हॉस्पिटल) यांनी डायबेटीस उपचारातील आधुनिक प्रवाह, रुग्णांच्या वय, सहव्याधी व जीवनशैलीनुसार उपचारपद्धतीत होणारे बदल, औषध निवड निकष तसेच Lifestyle Modification ची अनिवार्यता यावर सविस्तर मार्गदर्शन केले. सातत्यपूर्ण फॉलोअप आणि जागरूकतेचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
डेरवण हॉस्पिटलचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रणव शामराज यांनी डायबेटीसमुळे हृदय, मूत्रपिंड, नर्व्हस सिस्टीम, डोळे आणि इतर अवयवांवर होणाऱ्या दुष्परिणामांचा सखोल आढावा घेतला. आधुनिक उपचारपद्धती आणि नव्या संशोधनांची उपयुक्त माहिती त्यांनी उपस्थित डॉक्टरांपर्यंत पोहोचवली.
कार्यक्रमादरम्यान चिपळूण व आसपासच्या डॉक्टरांनी विविध मुद्द्यांवर उत्स्फूर्त चर्चा केली. वैद्यकीय सेवेत गुणवत्ता वाढवण्यासाठी अशा शैक्षणिक उपक्रमांची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ. रणजीत पाटील यांनी CGPA च्या वार्षिक स्पोर्ट्स डेची माहिती देत 2026 स्पोर्ट्स कमिटीची घोषणा केली. डॉक्टरांमधील आरोग्य, टीमवर्क आणि सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी क्रीडा उपक्रम महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रम स्नेहभोजनाने संपन्न झाला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव डॉ. ओंकार बेल्लारीकर, खजिनदार डॉ. अभिजित दुधाळ, डॉ. सौ. स्नेहल जोशी यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. डॉ. अरुण पाटील, डॉ. सुभाष उतेकर, डॉ. शिगवण, डॉ. अल्ताफ सरगुरोह, डॉ. जोगळेकर, डॉ. नितीन शिंदे, डॉ. संदीप दाभोळकर, डॉ. राजीव दंडगे, डॉ. तांबे, डॉ. शमशुद्दीन परकार, डॉ. इलियाज अत्तार यांसह मोठ्या संख्येने डॉक्टर उपस्थित होते.
मागील महिन्यातही CGPAतर्फे दिवाळी पाडवा निमित्त डॉक्टर व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित ‘स्वर-संध्या’ या संगीत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. तसेच Second Opinion and Financial Services तर्फे आयोजित आर्थिक साक्षरता व गुंतवणूक नियोजन कार्यशाळेलाही उल्लेखनीय प्रतिसाद लाभला. व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी मत व्यक्त केले असून, भविष्यातही अशाच नियोजनबद्ध कार्यक्रमांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

