( सातारा / प्रतिनिधी )
लेखक निर्मितीक्षम पुस्तकांना जन्म देत असतात, यामुळे आज ज्या लेखकांची पुस्तकं प्रकाशित झाली त्या सर्व लेखकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आज जरी या पुस्तकांचे प्रकाशन येथे झालं असले तरी, मी समाधानी नाही, कारण ही पुस्तकं मी येथे वाचू शकत नाही. यामुळे या पुस्तकांचे लोकार्पण तुमच्या गावी जावून असंख्य वाचकांना सोबत घेऊन करा असे आवाहन श्रीपाल सबनीस यांनी केले . लेखक मराठीचा पोत वाढवताय, ही मराठी खूप श्रीमंत आहे.संस्कृती उन्नत करणं सर्वांचे ध्येय आहे, हा सुगंधाचा ठेवा आहे. लिहीण वाचण आणि त्या प्रमाणे कृती करणं हे लेखकाच काम आहे असे मत माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.
प्राचार्य शिवाजीराव भोसले प्रकाशन मंच येथे आज ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी तीन ते पाच या वेळात एकूण २८ पुस्तकांचे प्रकाशन माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना सबनीस हे बोलत होते. यामध्ये पुणे येथील चपराक प्रकाशनच्या पाच पुस्तकांचा समावेश होता. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, प्राचार्य यशवंत पाटणे, कवी आश्लेषा महाजन, प्रकाशन समिती सदस्य, डॉ. केशव मोरे, प्रकाशन कट्टा समन्वयक घनश्याम पाटील, शिक्षणतज्ञ लेखक संदीप वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रकाशन समिती सदस्य डॉक्टर केशव मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाशन कट्टा समन्वयक घनश्याम पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे ग्रंथ देऊन स्वागत केले. यावेळी प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाविषयी घनश्याम पाटील यांनी थोडक्यात आढावा घेतला.
यावेळी बोलताना श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, चपराकचे संपादक, घनश्याम पाटील स्वतः एक प्रकाशक आहेत मात्र सर्व लेखकांचं, प्रकाशकांचं ते मनभरुन कौतुक करतायत ही अत्यंत आनंदाची बाब आहे . यावेळी बोलताना प्राचार्य यशवंत पाटणे यांनी लेखक आपल्या शब्दांची इमारत उभी करत असतो, या इमारतीत तो अनेकांना विसावा देतो. आज प्रकाशित झालेल्या काही पुस्तकांना मी प्रस्तावना देखील दिली आहे. लेखकांनी येथून नवी ऊर्जा घेऊन जाणे हाच अशा संमेलनाचा उद्देश असतो असे स्पष्ट केले.
यावेळी कोकणचे लेखक जे. डी. पराडकर यांनी त्यांच्या दोन पुस्तकांच्या प्रकाशनानंतर मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, आज कोकणची माणकं आणि फुलदाणी या दोन पुस्तकांचे प्रकाशन संमेलनाचे माझे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले याचा मला आनंद आहे. येथून मी खूप मोठी ऊर्जा घेऊन जाणार आहे. चपराक प्रकाशाने आजवर कोकणवरची माझी तेरा पुस्तके प्रकाशित केली आहेत. यामुळे कोकण महाराष्ट्रातच नव्हे तर, देशात आणि देशाबाहेर पोचवण्यात चपराक प्रकाशन चा वाटा खूप मोठा आहे. यासाठी मी संपादक घनश्याम पाटील यांना मनापासून धन्यवाद देतो. यावेळी अन्य काही लेखक आणि कवीनी आपले मनोगत व्यक्त केले.

