(गुहागर / वार्ताहर)
गुहागर तालुक्यातील चिंद्रवळे गावचे सुपुत्र आणि रुग्णसेवक मनोज डाफळे हे कोरोना काळापासून वैद्यकीय सेवेत कार्यरत असून, गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. गुहागर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यांतील रुग्णांना आवश्यकतेनुसार ते सहकार्य करत असून, वैद्यकीय सेवेसोबतच क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातही योगदान देत आहेत.
विरार-नालासोपारा परिसरातील कोकणवासीयांना मदत करताना रुग्णवाहिकेची गरज लक्षात आल्यानंतर गुहागर तालुक्याचे सुपुत्र तथा वरळी शिवसेनेचे माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या माध्यमातून रुग्णवाहिकेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. कोकणातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मनोज डाफळे यांच्याकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
याच सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून कोकणातील १२ दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ ३० ऑगस्ट रोजी करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेला मनोरंजनाचा कलगी-तुरा सामनाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
व्हीलचेअर वाटप शुभारंभ कार्यक्रमाला व्हीलचेअरचे सौजन्य करणारे प्रशांतदादा केळसकर यांचे बंधू प्रकाशदादा, विरार शिवसेना शहरप्रमुख उदयदादा जाधव, गुहागर तालुक्याचे सुपुत्र व माजी पोलीस उपनिरीक्षक मनोहर गुरव, स्वामी छाया ट्रॅव्हल्सचे मालक अक्षय जाधव, समाजसेवक मिलेश जाधव, मनसे पदाधिकारी अशोक कांबळे, समाजसेवक मंगेश किजबिले, पत्रकार अमोल पवार, भजन मंडळ पदाधिकारी जोगळे, नर्स नमिता गोणबरे, शाहीर सुधाकर गोणबरे, शाहीर अमित पेजले, विजय घाणेकर, आनंद नाचरे, विनायक वाघे, विलास गुरव आणि श्रीमती निर्मला तानाजी डाफळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
गरजू दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक केले.

