( संगमेश्वर/ प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने “मिशन जीवन” या सामाजिक उपक्रमांतर्गत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जेष्ठ नागरिकांसाठी मायेचा आणि सन्मानाचा अनोखा आदर्श उपक्रम राबविला. दिनांक १ जानेवारी रोजी जन्मदिन असणाऱ्या लांजा व संगमेश्वर तालुक्यातील सर्व जेष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने लांजा व संगमेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील, १ जानेवारी रोजी वाढदिवस असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. मिशन जीवन अंतर्गत वेरळ व गवाणे (लांजा) येथील सभागृह तसेच आंबेड खुर्द (संगमेश्वर) येथील सभागृहात हे कार्यक्रम पार पडले. लांजा पोलीस ठाणे हद्दीतील १७७ तर संगमेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील तब्बल ३०० जेष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या प्रसंगी पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी प्रत्येक जेष्ठ नागरिकाला गुलाबपुष्प देत शुभेच्छा दिल्या. केक कापून सर्वांचा वाढदिवस एकत्रितरीत्या साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा श्री. सुरेश कदम, लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. नीलकंठ बगळे, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजाराम चव्हाण यांच्यासह पोलीस पाटील, पोलीस अंमलदार, होमगार्ड्स व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी अनेक जेष्ठ नागरिकांनी आपली मनोगते व्यक्त करताना, रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच होत असल्याचे नमूद केले. पोलीस दलाकडून मिळालेल्या या सन्मानामुळे आपल्याला आधार आणि आपुलकीची भावना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी मिशन जीवन अंतर्गत जेष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती देत, त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेऊन निरसन केले. जिल्हा पोलीस दलाचे सहकार्य सदैव उपलब्ध राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे वेरळ–लांजा येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांचे पाय पाण्याने धुऊन आशीर्वाद घेत समाजात जेष्ठांप्रती आदर व कृतज्ञतेचा सकारात्मक संदेश दिला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी माणुसकी, सन्मान आणि सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय देणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला.


