(तवसाळ / सचिन कुळये)
तवसाळ गाव पंचक्रोशीतील जागृत देवस्थान असलेल्या श्री महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा भक्तिभाव, परंपरा आणि सांस्कृतिक उत्साहात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. माहेरवाशिणींची पाठराखीण म्हणून ओळख असलेल्या, तसेच इतिहासात ब्रिटिशांनीही देवत्व मान्य केलेल्या ग्रामदैवत श्री महामाई सोनसाखळी, देव रवळनाथ, त्रिमुखी व सोमजाई यांच्या मूर्तींसह नव्या मंदिराचा कलशारोहण व वर्धापन दिन सोहळा धुमधडाक्यात पार पडला.
अरबी समुद्र आणि शास्त्री नदी यांच्या संगमावर, डोंगर-दरीच्या कुशीत वसलेल्या या देवस्थानाचे नूतनीकरण जुन्या मंदिराच्या जागीच भव्य व देखणे असे करण्यात आले आहे. मंदिर नुतनीकरण, उद्घाटन आणि प्रथम वर्धापन दिनानिमित्त सलग तीन ते चार दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी, शनिवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी षोडशोपचारे पूजन, तर सायंकाळी देवीचे रूप लावणे (अलंकार पूजन) पार पडले. रात्री तवसाळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सुमधुर भजनांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
दुसऱ्या दिवशी, रविवार दि. १५ फेब्रुवारी रोजी मुख्य मंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा झाला. दुपारी १ वाजता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. रात्री उत्सवात रंगत भरण्यासाठी भजनांचा जंगी ‘२० x २०’ सामना आयोजित करण्यात आला. या भक्ती आणि कलेच्या संगमात कोकण व मुंबईतील नामवंत भजनी बुवा सुयश मुरारी काराणे (भांडुप) आणि बुवा श्री गणेश मनोहर जांभळे (बांद्रा) यांनी सादरीकरण केले. डबलबारी भजनाचा आस्वाद घेण्यासाठी पंचक्रोशीतील तसेच आसपासच्या गावांतील भजनप्रेमींनी मोठी उपस्थिती दर्शवली.
सोमवार दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी सत्यनारायणाची महापूजा झाली. दिवसभर भाविकांनी दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. रात्री पालशेत, वेळणेश्वर व नरवण येथील भजन मंडळांनी देवीचा महिमा गात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या स्थानिक सहकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कर्दे गावच्या श्री महामाई सोनसाखळी देवीचे पुजारी गुरव परिवार यांनी मंदिराच्या गाभाऱ्यापासून घुमटापर्यंत आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली होती. उजळून निघालेल्या मंदिराचे छायाचित्र टिपण्यासाठी भाविकांची विशेष गर्दी होती. तसेच वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.
मंगळवार दि. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता देवीला गार्हाणे घालून देवांची रूपे उतरविण्यात आली. या मंगलमयी सोहळ्याच्या समारोपप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मोहन यशवंत गडदे व समस्त तवसाळ ग्रामस्थांनी मुंबई, पुणे तसेच विविध ठिकाणांहून उपस्थित राहिलेल्या भाविकांचे आभार मानले. विशेषतः माहेरवाशिणींच्या लक्षणीय उपस्थितीमुळे उत्सवाची शोभा अधिकच वाढली आणि प्रथम वर्धापन दिन सोहळ्याची सांगता भक्तिभावात करण्यात आली.

