(देवळे / प्रकाश चाळके)
एकेकाळी सोशल मीडियात रमलेली तरुण पिढी लोककलेपासून दूर जात असल्याची चर्चा होती. मात्र सध्याचे वास्तव याला पूर्णतः छेद देणारे आहे. लोककलेचे सादरीकरण, अभ्यास आणि जतन यामध्ये आजची तरुणाई आघाडीवर येताना दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच लोककलेचा नवा जागर उभा राहत असून तरुण कलाकार या परंपरेचे नवे वारसदार ठरत आहेत.
राज्यभर कोकण, पुणे, मुंबईसह विविध जिल्ह्यांमध्ये लोककलेच्या कार्यक्रमांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. हे कार्यक्रम केवळ शहरी भागापुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर आयोजित होत असून अनेक कार्यक्रम हाऊसफुल्ल होत आहेत.
विशेष म्हणजे तरुण लोककलावंतांनी सादर केलेल्या शाहिरी, नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन, भारूड, पोवाडे, जागरण-गोंधळ, लोकगीते, लोकवाद्यांचे वादन, कोकणचे खेळे यांची रील्स सध्या इन्स्टाग्राम व फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. पूर्वी यात्रा-जत्रा व उत्सवांपुरती मर्यादित असलेली लोककला आता डिजिटल माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे.
काही काळ लोककला लोप पावत चालल्याची भावना व्यक्त केली जात होती. मात्र आता फोक आख्यान, फोकलोक, लोकगीतांचे गायन आणि लोकवाद्यांवर आधारित कार्यक्रम तरुण कलावंत अभ्यासपूर्ण सादरीकरणातून नव्याने लोकप्रिय करत आहेत. २० ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणी या लोककला चळवळीत सक्रिय सहभाग घेताना दिसत आहेत.
महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटी क्षेत्रातील नोकरदार, डॉक्टर, वकील, शिक्षक, बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी अशा विविध क्षेत्रांतील तरुण लोककलेचे कार्यक्रम सादर करत आहेत. प्रत्यक्ष कार्यक्रमांसोबतच जागरण-गोंधळ, नमन, जाखडी, कीर्तन आणि लोकवाद्यांवरील व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होत असून त्यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
याबाबत तरुण लोककलावंत शाहीर जितेंद्र महाडिक म्हणाले,
“गेल्या काही वर्षांपासून मी लोककलेचे कार्यक्रम सादर करीत आहे. गण, गवळण, बतावणी, भारूड, भजन यांसह लोप पावत चाललेली ‘पिंगळा’ ही लोककलाही सादर करतो. लोककलेचा वारसा जपणे आणि तो लोकांपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.”
मराठी मातीतील लोककलेचा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य आजची तरुणाई सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे करत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.

