( ठाणे )
ओडिशा आणि तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने उद्ध्वस्त केले आहे. खारेगाव टोलनाक्यावर सापळा रचून पोलिसांनी एका इनोव्हा कारमधून तब्बल ६३८ किलो गांजा जप्त करत २ कोटी १४ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे राज्यात होणाऱ्या आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीवर आळा बसला आहे.
मालमत्ता कक्षातील पोलीस हवालदार जयकर जाधव यांना एका आलिशान कारमधून मोठ्या प्रमाणात गांजा ठाणे परिसरात आणला जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने खारेगाव टोलनाक्याजवळ सापळा रचला. संशयास्पद इनोव्हा कार (क्रमांक AP 09 BF 9382) घटनास्थळी येताच पोलिसांनी तिला अडवून झडती घेतली. तपासादरम्यान कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवल्याचे उघड झाले.
या कारवाईत पोलिसांनी चिन्ना टागुर लक्ष्मण नायक (वय ३६, रा. मेहबूबनगर, तेलंगणा) याला ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून २ कोटी ४ लाख १६ हजार रुपये किमतीचा ६३८ किलो गांजा तसेच १० लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण २ कोटी १४ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला ३ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जप्त करण्यात आलेला गांजा ओडिशातून नेमका कोणासाठी आणला जात होता, त्यामागे कोणते आंतरराज्य टोळके कार्यरत आहे आणि या तस्करीचे धागेदोरे महाराष्ट्रात कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा अधिक तपास ठाणे गुन्हे शाखेचा मालमत्ता कक्ष करत आहे.

